मराठी

केंद्र सरकारची तिस-या मदत पॅकेजची तयारी

नवीदिल्ली/दि.२२  – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दोन दिवसांपूर्वीच चालू आर्थिक वर्षात सरकार आणखी एक मदत पॅकेज देण्याच्या विचारात आहे, असे सूतोवाच केले आहे. एक दिवसानंतर अर्थमंत्र्यांच्या एका सहका-याने माहिती दिली, की मंत्रालय तिस-या मदत पॅकेजवर काम करत आहे. आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाज म्हणाले, की अर्थमंत्र्यांनी आम्हाला तिस-या पॅकेजवर काम करण्यास सांगितले आहे आणि आम्ही प्रत्यक्षात त्यावर काम सुरू केले आहे.
बजाज म्हणाले, की विविध उद्योगांकडून आलेल्या सूचनांच्या आधारे आम्ही त्यावर काम करत आहोत. या कठीण काळात अर्थव्यवस्थेला चालना देणे फार महत्वाचे आहे. यापूर्वी अर्थमंत्र्यांनी दोन मदत पॅकेज्‌सची घोषणा केली आहे. त्यांचे मूल्य जीडीपीच्या 1.5% आहे. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत मे २०२० मध्ये पहिले पॅकेज जाहीर केले गेले. दुसरे पॅकेज एका आठवड्यापूर्वी सरकारने दिले आहे. तथापि, या प्रकरणातील समीक्षकांचे म्हणणे आहे, की या अडचणीत वित्तीय तूट वाढविण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे भारतातील मंदी इतर देशांपेक्षा अधिक दिसून येते. दुसरे मदत पॅकेज 12 ऑक्टोबर रोजी सरकारने जाहीर केले. या पॅकेजमध्ये सरकारने केंद्रीय कर्मचा-यांना प्रोत्साहन देण्यासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या पॅकेजची किंमत 46 हजार 675 कोटी रुपये आहे. सणासुदीच्या काळात अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी हे पॅकेज सरकारने दिले होते.

Related Articles

Back to top button