प्रभागनिहाय मतदारयादी कार्यक्रमानुसार निर्धारित वेळेत कार्यवाही करा
जिल्हाधिका-यांचे तहसीलदारांना आदेश
अमरावती/दि. २५ – जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदारयादी कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाला असून, त्यानुसार निर्धारित वेळेत कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मतदार यादीतील सर्व मतदारांना मतदानाची संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे अद्ययावत मतदार यादीनुसारच कार्यक्रम आयोगाने निश्चित केला आहे. या कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख 1 डिसेंबर आहे. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख 10 डिसेंबर आहे.
प्रभागनिहाय मतदारयादी करताना अद्ययावत यादीप्रमाणे सर्व नोंदी अचूक असाव्यात. ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेरील एकही मतदार समाविष्ट नसल्याची खातरजमा करावी. दुबार नावे, मयत, स्थलांतरित याबाबत आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही व्हावी. प्रारूप प्रभाग निहाय मतदार यादीला व्यापक प्रसिद्धी द्यावी. त्यावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांबाबत नियम लक्षात घेऊन मतदारयादी अंतिम करावी. यादीबाबत लेखनिकांच्या काही चुका, दुस-या प्रभागातील चुकून अंतर्भूत झालेले मतदार, 25 सप्टेंबरच्या अद्ययावत यादीत नाव असूनही प्रारूप यादीत ते नसणे आदी बाबी आढळल्यास त्या दुरुस्त कराव्यात. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी. प्रारूप तसेच अंतिम मतदार यादी ग्रामपंचायत, तलाठी सजा, मंडळ अधिकारी कार्यालय, पंचायत समिती व तहसील कार्यालयातील सूचना फलकांवर प्रसिद्ध करावी, तसेच विविध स्थानिक माध्यमांतूनही प्रसिद्धी द्यावी, आदी निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. नवाल यांनी दिले आहेत.
प्रभागनिहाय मतदारयादीचा कार्यक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण होईल याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
मतदार यादी कार्यक्रमानुसार सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात 553 ग्रामपंचायती असून, प्रभाग 1 हजार 823 व सदस्य संख्या 4 हजार 896 आहे.
अमरावती तालुक्यात 46 ग्रामपंचायती (154 प्रभाग व 416 सदस्य), भातकुली तालुक्यात 36 ग्रामपंचायती (116 प्रभाग व 312 सदस्य), तिवसा तालुक्यात 29 ग्रा. पं. (98 प्रभाग व 261 सदस्य), दर्यापूर तालुक्यात 50 ग्रा. पं. (163 प्रभाग व 444 सदस्य), मोर्शी तालुक्यात 39 ग्रा. पं. (131 प्रभाग व 349 सदस्य), वरूड तालुक्यात 41 ग्रा. पं. (139 प्रभाग व 279 सदस्य), अंजनगाव सुर्जी तालुक्यात 34 ग्रा. पं. (117 प्रभाग व 312 सदस्य), अचलपूर तालुक्यात 44 ग्रा. पं. ( 147 प्रभाग व 399 सदस्य), धारणी तालुक्यात 35 ग्रा. पं. (121 प्रभाग व 333 सदस्य), चिखलदरा तालुक्यात 23 ग्रा. पं. ( 71 प्रभाग व 199 सदस्य), नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 51 ग्रा. पं. ( 159 प्रभाग व 419 सदस्य), चांदूर रेल्वे तालुक्यात 29 ग्रा. पं. (93 प्रभाग व 235 सदस्य), चांदूर बाजार तालुक्यात 41 ग्रा. पं. (140 प्रभाग व 381 सदस्य) व धामणगाव रेल्वे तालुक्यात 55 ग्रा. पं. ( 174 प्रभाग व 457 सदस्य) यांचा समावेश आहे.