मराठी

मुख्यमंत्र्यांच्या नावे धनादेश पाठवून मदतीचा निषेध

हिंगोली/दि. २५ –  जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकांचे शंभर टक्के नुकसान होऊनही पिक विमा कंपनीने केवळ १८०० रुपयांचीच रक्कम दिल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह अन्य शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे १८०० रुपयांचे धनादेश पाठवून निषेध केला आहे. पिक विमा कंपनीने नियमाप्रमाणे पिक विमा देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
हिंगोल जिल्हयात या वर्षी १२४ टक्के पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन, तूर, उडीद, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर मागील काही वर्षाचा अनुभव लक्षात घेता या वर्षी तब्बल तीन लाख शेतकऱ्यांनी पिकविमा काढला होता. त्यातही सर्वांत जास्त सोयाबीनचा पिकविमा होता. त्यासाठी हेक्टरी नऊशे रुपयांची रक्कम शेतकऱ्यांनी पिकविमा कंपनीकडे भरणा केली होती, तर २०० रुपये ऑनलाईन विमा भरण्यासाठी लागले होते.
दरम्यान, शंभर टक्के नुकसान झाल्यामुळे पिकविमा कंपनीने किमान ४० ते ४३ हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देणे अपेक्षित होते; मात्र डोंगरकडा परिसरातील शेतकऱ्यांना हेक्टरी १८०० रुपयांची पिकविम्याची मदत मिळाली आहे. या प्रकारामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, माधव सावके, दीपक सावके, सुरज सावके, देवबा सावके, कोंडजी सावके, भानुदास सावके, गंगाधर वाबळे यांच्यासह शेतकऱ्यांनी पिकविमा कंपनीचे कार्यालय गाठून चार तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर डोंगरकडा येथील शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारीमुळे रावसाहेब अडकिणे व उद्धव गावंडे यांनी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून पिकविमा कंपनीकडून मिळालेला १८०० रुपयांचा पिकविमा नाकारत त्याचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे पाठविला आहे. शेतकऱ्यांना नियमानुसार पिकविमा मिळाला पाहिजे यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
जिल्ह्यात सोयाबीन व इतर पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचा अहवाल आहे; मात्र काही शेतकऱ्यांनी ७२ तासात नुकसानीची माहिती दिली नसल्याने त्यांना पिक विमा फेटाळण्यात आला, तर ज्यांनी माहिती दिली, त्यांना मात्र १८०० रुपये देऊन तोंडाला पाने पुसली आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांना पिकविमा रकमेचा धनादेश पाठविला आहे,  असे अडकिणे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button