माले/दि. ३१ – मालदीवमध्ये माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन(Abdulla Yamin) यांना सोडण्याच्या मागणीसाठी विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलकांनी भारतीय स्टेट बँकेचे कार्यालय(State Bank of India) पेटवून दिले. चीनधार्जिण्या विरोधी पक्षांनी मालदीव सरकारविरोधात आंदोलन करताना सत्ताधा-यांनी भारताला देश विकल्याचा आरोप केला आहे. तेथील सरकार जनतेशी संपर्क टिकवून ठेवण्यासाठी भारत समर्थित प्रकल्पांवर जोर देत आहे. भारतानं नव्याने जाहीर केलेली आर्थिक मदत लवकरात लवकर जनतेला मिळावी, यावरही सरकार भर देत आहे. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आहे. भारतीय दूतावासासह अनेक मोठ्या संस्था असलेल्या राजधानी मालेच्या बाहेर सुरक्षा वाढविली आहे. मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल भारतीय दूतावासाच्या संरक्षणाखाली तैनात करण्यात आले आहे. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले, की दोन्ही देश सहकार्यासाठी वचनबद्ध आहेत. भारतीय सहकार्याने सुरू असलेले प्रकल्प जलद गतीने मार्गी लागत आहेत आणि लवकरच मालदीवच्या लोकांना त्याचा फायदा होण्यास सुरुवात होईल.
यामीन यांना सोडण्याच्या मागणीसाठी मोटारसायकल रॅली काढल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात यामीन अबी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. नोव्हेंबर २०१८मध्ये इब्राहिम सोलीह यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर मालदीवशी संबंधांची नवी सुरुवात असल्याचे भारताने म्हटले होतं. अधिका-यांनी सांगितले, की सोलीह यांचे सरकार स्थापनेनंतर भारताने आतापर्यंत मालदीवला दोन अब्ज डॉलर्स देण्याचे आश्वासन दिले आहे.