दंड न भरल्याने महिलेवर पंचांचा सामूहिक बलात्कार
कोलकाता: पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात (In the Birbhum district of West Bengal) एक धक्कादायक आणि लज्जास्पद घटना घडली. एका आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. या महिलेवर अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप होता. पंचायतीने तिला एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. रक्कम जमा न केल्याने पंचांनीच महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार आहेत. बीरभूम जिल्ह्यातील मोहम्मद बाजार परिसरात ही घटना घडली. एका तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडित महिलेवर होता. त्यानंतर गावातील पंचांनी न्यायनिवाडा करण्यासाठी पंचायतीची बैठक बोलावली. त्यात महिला आणि संबंधित तरुणाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. ५० हजार रुपयांचा दंड भरल्यानंतर तरुणाची सुटका करण्यात आली, तर महिलेला फक्त १० हजार रुपये देता आले. दंडाची संपूर्ण रक्कम न भरल्याने तिला जबरदस्तीने जंगलात नेण्यात आले आणि तिथे तिच्यावर सात जणांनी बलात्कार केला. भोलाबंध गावात घडलेल्या या घटनेतील पीडित महिलेने गावच्या प्रमुखासह सात जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी कातिज हंसदा, जलपा हंसदा यांच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर अन्य तिघांचा शोध घेण्यात येत आहे. महिलेची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायतीची बैठक बोलावल्यानंतर स्थानिकांनी दोन तरुण आणि महिलेला बेदम मारहाण केली होती. दरम्यान, आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.