-
अजित पवार यांची माहिती;
-
पावणेदोन तासांत प्रवास होणार
प्रतिनिधि/दी.4
मुंबईः पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे. ‘कोरोना’चे संकट असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करू, असा विश्वास व्यक्त करताना या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात ‘महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट कार्पोरेशन लिमिटेड’ तथा ‘महारेल’च्यावतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अशोक पवार, आमदार चेतन तुपे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार सरोज आहिरे आदी लोकप्रतिनिधी तसेच ‘महारेल’चे महाव्यवस्थापक, वित्त, नियोजन, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, की पुणे आणि नाशिक ही दोन शहरे औद्योगिक, कृषी विकासात अव्वल आहेत. या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प’ उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, नगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार आहे. त्यांचबरोबर या रेल्वेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अत्यंत कमी खर्चात पूर्ण होणा-या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. अवघ्या पावणेदोन तासात हे अंतर कापले जाणार आहे.
सध्याच्या भूसंपादनाच्या प्रचलित कायद्याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे. या मार्गावरील रेल्वेस्थानकात बाधित प्रकल्पग्रस्तांसह स्थानिकांना व्यवसायासाठी प्राधान्याने स्टॉल दिले जातील. या प्रकल्पाच्या कामातही स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, नगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषिमालाच्या वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात येणार असून या प्रकल्पासाठी चिनी उत्पादने किंवा सेवा उपयोगात आणल्या जाणार नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली.
या वेळी ‘महारेल’च्यावतीने प्रकल्पाच्या कामाचे सादरीकीकरण करण्यात आले. उपस्थित लोकप्रतिनिधींनी विविध सूचना मांडल्या.
- प्रकल्पाची वैशिष्ठ्येः
235 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग
पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार
दोनशे किलोमीटर प्रतितास वेग, पुढे अडीचशे किलोमीटर होणार
वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरणपूरक प्रकल्प
पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानके
18 बोगदे, 41 उड्डाणपूल, 128 भुयारी मार्ग प्रस्तावित
प्रवासी आणि मालवाहतूक होणार.
रेल्वे स्थानकात प्रकल्पबाधितांसह, स्थानिकांना व्यवसायासाठी प्राधान्य
प्रकल्पाच्या खर्चात 60 टक्के वित्तीय संस्था, 20 टक्के राज्य सरकार, 20 टक्के रेल्वेचा वाटा
कमी खर्चात प्रकल्प मार्गी लावणार
विद्युतीकरणासह एकाचवेळी दोन ट्रॅक