मातृवियोगाचे दुःख बाजूला ठेवून टोपे जुंपले कामाला
मुंबई: राज्यात कोरोनाचे संकट आल्यापासून पायाला qभगरी लावून फिरणारे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे मातृवियोगाचे दु:ख बाजूला ठेवून पुन्हा एकदा कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरले आहेत. आईच्या निधनानंतर चौथ्याच दिवशी टोपे यांनी कामाला सुरुवात केली आहे. टोपे यांच्या आई शारदाताई यांचे शनिवारी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. रविवारी त्यांच्यावर जालना जिल्ह्यातील मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. टोपे कुटुंबीयांचे राज्यभर असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी होईल, हे लक्षात घेऊन टोपे यांनी फेसबुक, ट्विटरद्वारे अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. अंत्यसंस्कारासाठी प्रत्यक्ष उपस्थित न राहता फेसबुकवरूनच अंत्यदर्शन घेण्याचे आणि आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर टोपे पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी त्यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. बुधवारी मुंबईत आल्यानंतर दैनंदिन बैठका घेऊन कामकाजाला सुरुवात केली. आईने शेवटच्या काळात पाठीवर दोन्ही हात ठेवून आशीर्वाद दिला होता. त्याच आशीर्वादाच्या बळावर पुन्हा जोमाने कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलो आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागात आजही कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर १४ दिवसांचे सूतक पाळले जाते. कुटुंबीयांनी कोणतेही काम न करता घरातच थांबण्याची प्रथा आहे; मात्र टोपे यांनी चौथ्या दिवशीच कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी स्वत:च यामागची त्यांची भूमिका सांगितली. ‘पूर्वी निरोप जायला वेळ लागायचा. दळणवळणाची साधने पुरेशी नसल्याने नातेवाइक यायलाही विलंब व्हायचा; मात्र आता परिस्थिती बदलली आहे. काळाबरोबर चालणे गरजेचे आहे. बदलाची सुरुवात स्वत:पासून करण्याचा संदेश समाजापुढे द्यायचा होता म्हणूनच आईच्या निधनानंतर १४ दिवसांचा दुखवटा न पाळता या काळातील विधी तीन दिवसांत केले, असे टोपे यांनी सांगितले. .