मराठी
‘पीएफआय’ कार्यालयावर छापे
औरंगाबाद/दि.३ – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या औरंगाबाद शहरातील राज्य कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी)आज सकाळी धाड टाकली. सुमारे अडीज तास कार्यालयाची झाडाझडती घेऊन आणि दोन पदाधिकाऱ्यांची चौकशी करून पथक परतले. तसेच केरळमधील पॉप्युलर फ्रँट ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओमा सलाम, राष्ट्रीय सचिव नसरुद्दीन इलामराम यांच्या ठिकाणांवरही ईडीने छापा टाकला आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेचे महाराष्ट्र कार्यालय औरंगाबादमधील जुना बायजीपुरा येथे आहे. या कार्यालयावर ईडीच्या पथकाने पोलिसांना सोबत घेऊन सकाळी 10 वाजता धडक मारली. तेव्हा कार्यालयात जिल्हा कमिटीचे सदस्य कलीम उपस्थित होते. संस्थेचे जिल्हाध्यक्ष इरफान मिली यांना गुरुवारी अमलबजावणी संचलनालयाचे अधिकारी इश्वर यांनी कॉल करून कार्यालयात बोलावून घेतले. यानंतर इर्फान मिली आणि कलीम यांची अधिकाऱ्यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली.
आर्थिक व्यवहार आणि अन्य कागदपत्रे जप्त
उच्च शिक्षणासाठी मुस्लिम विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यासाठी पैसा कुठून येतो. संस्थेचे देणगीदार कोण आहे? कार्यालयातून राज्यभरातील किती कार्यालयावर नियंत्रण ठेवले जाते ? यासह अन्य मुद्द्यावर चौकशी केली. यावेळी ईडी च्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातील आर्थिक व्यवहारासंबंधी पासबूक बॅंक स्टेटमेंट आदी कागदपत्रासह संस्थाच्या विविध उपक्रमाबद्दल असलेली कागदपत्रे जप्त केली. यानंतर पथकाने कलीम यांना शहरातील केंद्रीय जीएसटी कार्यालयात नेऊन चौकशी केली. कार्यालयात जप्त कागदपत्राविषयी आणि झडतीबद्दल पंचनामा करण्यात आल्याची माहिती आहे.