२०.१३ दशलक्ष टन मालाची रेलवे ने केली वाहतूक
मध्य रेल्वेने 8,025 मालगाड्यांमधून कोळसा आणि इतर संकीर्ण वस्तूंची केली वाहतूक
अकोला/दि.३१– कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असली, तरी या काळात ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी वस्तू व माल वेळेवर पोहोचविण्यासाठी मालगाड्या सुरू आहेत. मध्य रेल्वेने लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यानच्या 150 दिवसांत ऊर्जा, उद्योग व कृषी क्षेत्राची गरज पूर्ण करीत, 20.13 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे.
देशांतर्गत मालवाहतुकीसाठी रेल्वेचा सर्वाधिक वापर होतो. अवजड उद्योग, कृषीपूरक साहित्य, ऊर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रातील मालवाहतुकीसाठी रेल्वे हा सर्वोत्तम पर्याय आहे. देशभरात लॉकडाऊनदरम्यान स्थलांतरितांना ने-आण करण्यासाठी काही गाड्या वगळता रेल्वेची प्रवासी वाहतूक सेवा बंदच आहे. या काळात रेल्वेने मालवाहतूक मात्र पूर्ण क्षमतेने चालू ठेवली. लॉकडाऊन सुरू झाले तेव्हापासून 23 मार्च 2020 ते अनलॉक-3 च्या 19 ऑगस्ट 2020 या 150 दिवसांच्या कालावधीत मध्य रेल्वेने 8,025 मालगाड्यांमधून कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड आणि स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर संकीर्ण वस्तूंची वाहतूक केली. या कालावधीत दररोज सरासरी 2,558 वाघिणी मालाची वाहतूक केली. वाघिणी भारांच्या बाबतीत 3,83,189 वाघिणींमध्ये 20.13 दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्यात आली.
मध्य रेल्वेने अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 1,45,315 कोळशाच्या वाघिणींचा पुरवठा विविध ऊर्जा प्रकल्पांना केला. तसेच 4,248 वाघिणींमधून अन्नधान्य आणि साखर; शेतकऱ्यांच्या हितासाठी 17,536 वाघिणी खते आणि 5,305 कांदा; पेट्रोलियम पदार्थांच्या 37,840 वाघिणी, लोह आणि स्टीलच्या 9,909 वाघिणी, सिमेंटच्या 25,112 वाघिणी, 1,18,826 कंटेनर वाघिणी आणि सुमारे 19,098 वाघिणी डी-ऑइल केक व इतर वस्तूंची वाहतूक केली.