रजनीकांत यांची राजकारणाला २६ दिवसांत सोडचिठ्ठी
चेन्नई/दि. २९ – दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या बिघडलेल्या तब्येतीमुळे निवडणुकीच्या राजकारणात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीला उभे न राहता बाहेरून लोकांची सेवा करू, असे त्यांनी तमिळीमध्ये लिहिलेल्या एका पत्रात सांगितले. याबद्दल त्यांनी चाहत्यांची माफी देखील मागितली आहे.
रजनीकांत यांना रक्तदाबातील चढउतार आणि थकवा जाणवल्यामुळे 25 डिसेंबर रोजी हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांनंतर त्यांना सुटी देण्यात आली. या वेळी डॉक्टरांनी रजनी यांना एक आठवड्यापर्यंत बेड रेस्ट, किमान शारीरिक क्रियाकलाप आणि कोरोनापासून वाचण्याचा सल्ला दिला होता. रजनीकांत यांनी पक्ष स्थापन करण्याचा आणि 2021 विधानसभा निवडणूक लढणार असल्याची तीन डिसेंबर रोजी घोषणा केली होती. तसेच 31 डिसेंबर रोजी नवीन पक्षाची घोषणा करणार असल्याचेही ते म्हणाले होते. राजकारणात अभिनेता कमल हसनसोबत युती करणार असल्याचे रजनीकांत यांनी गेल्यावर्षी सांगितले होते. रजनीकांत यांनी त्या वेळी म्हटले होते, की जर कमल हासन यांच्याशी युती करण्याची स्थिती झाली, तर राज्यातील लोकांचे हित लक्षात घेऊन निश्चितपणे एकत्र येऊ.
रजनीकांत जर निवडणुकीत उतरले असते, तर ते राजकारणात येणारे दाक्षिणात्य चित्रपटांमधील 8 वे दिग्गज ठरले असते. अशा मोठ्या नावांमध्ये डॉ. एम. जी. रामचंद्रन, एम. करुणानिधी, जे जयललिता, कमल हसन, विजयकांत, सरत कुमार आणि करुनास यांचा समावेश आहे.