मराठी

रजनीकांतचा नवा पक्ष तमिळनाडूत चमत्कार घडविणार ?

चेन्नई/दि.३ – तमिळनाडू विधानसभेच्या पुढच्या वर्षी निवडणुका असून त्यापूर्वी सुपरस्टार रजनीकांत 31 डिसेंबर रोजी नवीन राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत. द्रमुक, अण्माद्रमुक या दोन पक्षांभोवती तिथे सत्ता फिरत असताना आणि भाजपनेही तमिळनाडूत जोर लावला असताना रजनीकांत यांचा पक्ष खरेच काय चमत्कार करणार, याकडे लक्ष लागले आहे.
तमिळ चित्रपटांच्या सुपरस्टार रजनीकांतच्या राजकारणात प्रवेशाविषयी जे काही वाद आणि अनिश्चितता होती, ती आता संपली आहे. रजनीकांत यांनी 31 डिसेंबर रोजी आपला नवीन राजकीय पक्ष स्थापनेची घोषणा केली आहे. यानंतर पुढच्या वर्षी जानेवारीत ते आपला राजकीय पक्षाचे काम सुरू करणार आहेत. तमिळनाडू विधानसभा निवडणुका पुढच्या वर्षी एप्रिल-मेमध्ये होणार आहेत. बुधवारी त्यांनी निवडणूक राजकारणाच्या आपल्या योजनांवर लवकरच स्वतःचा निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. रजनीकांत म्हणाले, की आम्ही विधानसभा निवडणुका नक्कीच जिंकू. आम्ही प्रामाणिक, पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि आध्यात्मिक राजकारण करू. एक आश्चर्य आणि चमत्कार नक्कीच घडेल. रजनीकांत बरेच दिवस राजकारणात येत असल्याची चर्चा आहे. रजनीकांत यांनी डिसेंबर २०१७ मध्ये प्रथम राजकारणात प्रवेशाची घोषणा केली होती; परंतु त्यांनी स्वत: चा पक्ष स्थापन करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नव्हती.
30 नोव्हेंबर रोजी आपल्या समर्थकांशी भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितले, की लवकरच आपण निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या निर्णयाविषयी घोषणा करू. रजनीकांत यांनी रजनी मक्कल मंद्रामच्या जिल्हा सचिवांची भेट घेतली आहे आणि राजकारणात येण्याच्या शक्यतेवर चर्चा केली आहे. गेल्या महिन्यात, रजनीकांत यांनी म्हटले होते, की 2016 मध्ये अमेरिकेत त्याचे मूत्रपिंड प्रत्यारोपण केले गेले होते आणि कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर त्यांच्या राजकारण प्रवेशाविरूद्ध आहेत. त्यामुळे त्यां च्या राजकारण प्रवेशाबाबत साशंकरता होती. ती आता संपली आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन दिवसांच्या तमिळनाडू दाै-यात रजनीकांत यांची भेट घेतल्याची चर्चा होती. अशा परिस्थितीत रजनीकांतच्या राजकीय पक्षाच्या घोषणेमुळे त्यांना खरेच गांभीर्याने राजकारण करायचे आहे, की तमिळनाडूत भाजपची बी टीम म्हणून काम करायचे आहे, याविषयी शंका घेतल्या जात आहेत.

Related Articles

Back to top button