तेहरान: भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इराणचे संरक्षण संरक्षण मंत्री ब्रिगेडिअर जनरल आमिर हतामी यांच्या आज द्वीपक्षीय चर्चा झाली. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही चर्चा अतिशय सकारात्मक झाली. दोन्ही देशातील मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्यासह अफगाणिस्तानसह क्षेत्रीय संरक्षणाशी निगडित मुद्यांवर चर्चा झाली. रशियाच्या दौऱ्यानंतर राजनाथ सिंह यांनी अचानकपणे इराणला भेट दिली.
राजनाथ यांनी या भेटीबाबत ट्वीट करून माहिती दिली. भारत आणि इराणच्या संरक्षण मंत्र्यामध्ये झालेली बैठक अतिशय सकारात्मक झाली असल्याचे त्यांनी सांगितले. अफगाणिस्तानमध्ये शांतता, स्थिरता आणि क्षेत्रीय सुरक्षितेच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली असल्याचे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. अफगाणिस्तानमधील सुरक्षितेच्या मुद्यावर भारताने चिंता व्यक्त केली. शांततेच्या मुद्यावर अफगाणिस्तानमधील सरकार करत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत भारत आणि इराण दरम्यानच्या जुन्या सांस्कृतिक, भाषिक आणि मानवी संस्कृतीच्या संबंधांवर जोर देण्यात आला.
रशियात शांघाय सहकार्य परिषदेच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर राजनाथ सिंह हे अचानक तेहरानमध्ये दाखल झाले. चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ यांच्या इराण दौऱ्याला महत्त्व आले. चीन आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. चीनने इराणसोबत अब्जावधींचा करार केला होता. त्यामध्ये संरक्षण, व्यापार आदीसह इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या करारांचा समावेश आहे. त्यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली होती. इराणला आपल्या बाजूने पुन्हा वळवून चीनला धोबीपछाड देण्याचा भारताचा प्रयत्न आहे.