राजू शेट्टी यांचा उद्या बारामतीत मोर्चा
पुणेः माजी खासदार राजू शेट्टी (Former MP Raju Shetty) हे बारामतीत दूध उत्पादकांसमवेत २७ तारखेला प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. शेट्टी यांचे महाविकास आघाडीशी सूत जुळल्यानंतरही ते येथे मोर्चा काढत आहेत. राज्यातील एकूण संकलित दूध उत्पादनापैकी निम्मे दूध पुणे जिल्ह्यातच संकलित होत असल्याने दुधाचे आंदोलन येथून सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. राज्यातील दुध उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असून २५ रुपये प्रतिलिटरचा दर राज्यात शेतकèयांच्या पोरांचे सरकार आल्यानंतरही १७ ते १८ रुपयांवर घसरला आहे. उत्पादन खर्चापेक्षा निम्म्या दराने दूध उत्पादकांना दर मिळत असून प्रतिलिटर ३० ते ३५ रुपये उत्पादन खर्च असलेल्या दुधाचा दर वाढवून द्यावा, दुधावरील जीएसटी रद्द करावी, केंद्र सरकारने दुधाच्या भुकटी आयातीचा निर्णय रद्द करावा अशा विविध मागण्या घेऊन स्वाभिमानीने दूध दर आंदोलन सुरू केले आहे. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात त्यांनी केलेले दूध दराचे आंदोलनही गाजले. विशेषतः त्यांनी ठाणे, पालघर जिल्ह्यात रेल्वे स्थानकात थांबून गुजरातमधून येणाèया दुधाच्या रेल्वेस केलेला विरोध सर्वांच्याच लक्षात आला. त्यांच्या आंदोलनामुळे सरकारलाही नमते घेत प्रतिलिटर २५ रुपये दराची घोषणा करावी लागली होती. आता बारामतीत पुन्हा एकदा शेट्टी येत आहेत. फरक थोडा पडला आहे. पुन्हा सरकार महाविकास आघाडीचे असले तरीदेखील शेट्टी यांनी काळानुसार या सरकारशी मिळतेजुळते घेतले आहे. अशा परिस्थितीत त्यांचे हे आंदोलन पूर्वीसारखेच टोकदार होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. इंदापूर- बारामतीत दुधाचे अनेक प्रकल्प आहेत व सर्वाधिक दूध संकलन याच ठिकाणी होते. त्यामुळेही येथेच आंदोलन करण्याचा निर्णय शेट्टी यांनी घेतला असण्याची शक्यता आहे.