
नवी दिल्ली/दि. ११ – लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी शुक्रवारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याचे म्हटले आहे. आपल्या अनुपस्थितीत आपला मुलगा चिराग पासवान यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवल्याचेही त्यांनी म्हटले. पक्षासंबंधी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार तसेच एखाद्या पक्षासोबत जाण्याचा किंवा न जाण्यासंबंधी चिराग पासवान जे निर्णय घेतील, ते अंतिम निर्णय असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपासून रामविलास पासवान आजारी आहेत. आपली तब्येत खालावल्याचे लक्षात आल्यानंतर रामविलास पासवान यांनी ही माहिती उघड केली; मात्र आपल्या आजारासंबंधी त्यांनी माहिती दिलेली नाही.
कोरोना संकटकाळात खाद्य मंत्री म्हणून आपली सेवा देण्यसाठी आणि योग्य वेळी खाद्यसामग्री जागेवर पोहचण्यासाठी हरएक प्रकारे प्रयत्न केले. याच दरम्यान तब्येत आणखी खालावू लागली; परंतु कामात काही अडथळे येऊ नये यासाठी मी रुग्णालयात दाखल होण्याचे टाळले होते; परंतु माझी तब्येत ढासळल्याचे चिरागच्या लक्षात येताच त्याच्या सांगण्यावरून मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो आहे, असे रामविलास यांनी म्हटले. ‘मला आनंद आहे, की या वेळी माझा मुलगा चिराग माझ्यासोबत आहे आणि माझी शक्य तेवढी सेवा करत आहे. माझी काळजी घेण्यासोबतच तो पक्षाप्रती असलेली जबाबदारीही योग्य पद्धतीने पार पाडत आहे. मला विश्वास आहे, की आपल्या तरुण विचारांनी चिराग पक्ष आणि बिहारला नव्या उंचीवर घेऊन जाईल.
चिरागच्या प्रत्येक निर्णयासोबत मी कणखरपणे उभा आहे. मला आशा आहे, की लवकरच बरा होऊन लवकरच आप्तेष्टांजवळ येईल,’ असे म्हणत पासवान यांनी आपल्या मुलावर विश्वास व्यक्त केला आहे. आगामी बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामविलास पासवान यांच्या या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पक्षाची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. जवळपास १४३ जागांवरून आपले उमेदवार रिंगणात उतरवण्याची पक्षाची तयारी झाली आहे. या दरम्यान आता पक्षाच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयाची जबाबदारी चिराग पासवान यांच्याच खांद्यावर आहे.