धार्मिक स्थळे आठ दिवसांत सुरू होणार
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ड. आंबेडकरांचे आंदोलन मागे
मुंबई पंढरपूर/दि. ३१ – आठ दिवसांत नियमावली तयार करून मंदिरे खुली केली जातील, असे आश्वासन मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ड. प्रकाश आंबेडकर(PRAKASH AMBEDKAR) यांनी सांगितले. ठाकरे(UDDHAV THACKREY) यांच्या आश्वासनानंतर ड. आंबेडकर यांनी पंढरपुरातील आंदोलन मागे घेतले. विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीकडून मंदिरे सुरू क़रण्यासाठी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. ड. आंबेडकर यांनी आश्वासन पूर्ण झाले नाही, तर पुन्हा पंढरपुरात येऊन आंदोलन करू, असा इशारा या वेळी दिला. ड. आंबेडकर यांनी मंदिरत जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. या वेळी १५ जणांना त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी देण्यात आली
. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आल्यानंतर ड. आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंदिर, मशीद, बुद्धविहार सुरू केली जातील, असे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. त्यासाठी सरकार नियमावली तयार करत असून त्यासाठी आठ दिवस लागतील असे सांगितले. जर आदेश आला नाही, तर पुन्हा पंढरपुरात आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. वंचितच्या आंदोलनाला यश आले असून लोकभावनेचा आदर केल्याने सरकारचे त्यांनी आभार मानले. ८५ टक्के लोक बरे झाले आहेत, तर मग घाबरायचं कशाला, अशी विचारणा करताना पुन्हा या प्रश्नावर लढायला आम्हाला लावू नका असे ड. आंबेडकर म्हणाले. ड. आंबेडकर यांनी नियम मोडण्यासाठीच आलो आहोत, असे सांगत आंदोलनाला जमलेल्या हजारोंच्या गर्दीचे समर्थन केले. ते म्हणाले, की या लोकांच्या भावना आहेत. लोकच शासनाला दाखून देत आहेत. हे पाहून सरकारने आपली भूमिका बदलावी, असे आवाहन त्यांनी केले. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे असं सांगितलं असता लोक जमली तरी प्रादुर्भाव वाढत नाही हेच आम्हाला दाखवायचं आहे, असे त्यांनी सांगितले.