बीड/दि. २९ – स्वत:सह मुलीवरही नराधमांनी बलात्कार केला. यानंतर न्यायालयीन लढा देत, आपल्या तक्रारीवर ठाम राहून चार बलात्काऱ्यांना जन्मठेपेपर्यंत पोहोचवणाऱ्या पीडितेविरोधातच बीड जिल्ह्यातील तीन गावांच्या ग्रामपंचायतींनी चक्क गावबंदीचा ठराव केला आहे. इतकेच नाही, तर ठरावात पीडित महिलेवर व्यभिचाराचेही आरोप करण्यात आलेत. आश्चर्य म्हणजे, ज्या ग्रामपंचायतींनी गावबंदीचे हे ठराव केले, त्या तिन्ही गावांच्या सरपंच महिलाच आहेत.
गेवराई तालुक्यातील पाचेगाव, वसंतनगर तांडा, जयराम नाईक तांडा अशी या तीन ग्रामपंचायतींची नावे आहेत. गावकऱ्यांनी सोमवारी महिलेविरोधात पोलिस अधीक्षकांना निवेदन दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. पाचेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच शाहिस्ता इम्तियाज या असून ठरावाच्या सूचक चांगुणा राठोड आहेत. जयराम नाईक तांडा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुसया देविदास पवार आहेत, तर या ठरावाच्या सूचक सुनीता सुभाष राठोड आहेत. वसंतनगर तांड्याच्या सरपंच संगीता संजय राठोड आहेत.
दरम्यान, बीडमध्ये राहणारी ३० वर्षांची पीडित महिला पाचेगाव येथे कापूस वेचणीसाठी गेली होती. एक जानेवारी २०१५ रोजी जीपचालक व तीन मित्रांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर २२ ऑक्टोबर २०२० रोजी न्यायालयाने चौघांना दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली होती. तिच्या अल्पवयीन मुलीवरही बीडमध्ये बलात्कार झाला होता. दरम्यान, पाण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर पीडितेच्या विरोधात गेल्या आठवड्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयात पाचेगाव ग्रामस्थ निवेदन देण्यासाठी आले होते. याच वेळी पीडिताही आपल्या मुलींसह तिथे पोहोचली. तिने आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा उपअधीक्षकांसमोर मांडत आक्रोश केला. उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांनी तिची बाजू ऐकली, तर पोलिस अधीक्षकांनी गावकऱ्यांची बाजू ऐकली.