मराठी

शेतक-यांच्या समर्थनार्थ पद्मविभूषण परत

चंदीगड/दि.३ – केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांच्या बाजूने सरकारवर दबाव वाढत आहे. खेळाडूंनी पुरस्कार वापसीची घोषणा केली असताना  पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांनी पद्मविभूषण सन्मान परत केला आहे. बादल हे भाजपच्या मित्रपक्षाचे नेते आहेत.
कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्ली-हरयाणा सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. शेतकरी सरकारबरोबर चर्चाही करीत आहेत. दरम्यान, बादल (वय 92) यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पद्मविभूषण परत केला आहे. बादल यांना हा पुरस्कार 2015 मध्ये मिळाला होता. बादल यांचा पक्ष, शिरोमणी अकाली दल, 22 वर्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत होता; पण त्यांनी शेती कायद्याच्या निषेधार्थ सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी 17 सप्टेंबरला हरसिमरत कौर बादल यांनीही मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला.
बादल म्हणाले, की मी एवढा गरीब आहे, की शेतकऱ्यांसाठी अर्पण करण्याला माझ्याकडे काहीच नाही. मी जो काही आहे तो या शेतकऱ्यांमुळेच आहे. अशात जर शेतकऱ्यांचा अपमान होत असेल, तर कोणत्याही प्रकारचा सन्मान राखून ठेवण्यात अर्थ नाही. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना मोठे दुःख झाले आहे. त्यांच्या आंदोलनाला चुकीच्या पद्धतीने सादर केले जात आहे, हे अतिशय दुःखद आहे.
दरम्यान, 40 नेत्यांची सरकारसोबत विज्ञान भवनात बातचीत सुरू होती. सरकारकडून कृषिमंत्री नरेंद्र तोमर उपस्थित आहेत. तोमर म्हणाले, की चर्चेचा सकारात्मक परिणाम होईल. दुसरीकडे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले, की त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढावा असे आवाहन गृहमंत्र्यांना केले आहे. या मुद्द्यांमुळे पंजाबची अर्थव्यवस्था व देशाच्या सुरक्षेवर परिणाम होत आहे. हे प्रकरण लवकरच मार्गी लावण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांनाही केले आहे.

Related Articles

Back to top button