आरोग्यमंत्र्यांकडून जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा
रूग्णांची अडवणूक करणा-या रूग्णालयांवर दंडात्मक कारवाई करा
अमरावती, दि. २५ : स्त्री रूग्णालयाचे कामकाज पूर्णत्वास जाण्यासाठी आवश्यक निधी, लिक्वीड ऑक्सिजनसाठी टँकर, मेळघाटसाठी रूग्णवाहिका, तसेच कोरोना प्रतिबंध उपाययोजनांच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. कोरोनाबाबत तपासणी दर व उपचार दर निश्चित करून देण्यात आले आहेत. तथापि, जादा दर आकारून रूग्णांची अडवणूक करणा-यांवर कठोर भूमिका घेऊन दंडात्मक कारवाई करावी, असे सुस्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवनात जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेताना ते बोलत होते. राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर, आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार देवेंद्र भुयार, जि. प. अध्यक्ष बबलू देशमुख, महापौर चेतन गावंडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा घेताना आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणाले की, जिल्ह्याचा मृत्यूदर 2.11 आहे. तो एका टक्क्याहून कमी व्हावा, यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 30 टक्के आहे, तो 10 टक्क्यांहून कमी झाला पाहिजे. त्यासाठी तपासण्यांची संख्या एक हजारपर्यंत वाढवावी. प्लाझ्माची सुविधा सुरू करण्यात आली, पण त्याबरोबरच त्याचा सक्सेस रेटही तपासावा. त्यासाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडून तपासून घ्यावे. प्लाझ्माबाबत व्यवहारात गैरप्रकार घडू नयेत यासाठी दरनिश्चिती करण्यात आली आहे. खाटांच्या उपलब्धता व इतर सुविधांसाठी वेळोवेळची माहिती अचूक देणारा डॅशबोर्ड असावा. लिक्विड ऑक्सिजनबाबत भिलाई येथून एक आणखी टँकर उपलब्ध व्हावा, यासाठी कार्यवाही करण्यात येईल. स्टोरेजसाठी आवश्यक टँकचे काम तत्काळ पूर्ण करावे. त्याचप्रमाणे, ड्युरा सिलेंडरची व्यवस्था कार्यान्वित करून घ्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
स्त्री रूग्णालयाचे कामकाज पूर्णत्वास जाण्यासाठी 20 कोटी रूपये निधी व मेळघाटसाठी रूग्णवाहिका द्याव्यात, अशी मागणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केली. त्याबाबत आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, स्त्री रूग्णालयासाठीचा निधी तत्काळ मिळवून देण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे, शासनाकडून 250 रूग्णवाहिका खरेदी करण्यात येत आहेत. त्यातील रूग्णवाहिका मेळघाटसाठी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येतील. मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर व इतर पदभरतीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून मनुष्यबळासाठी सतत प्रयत्न व्हावेत, असेही त्यांनी सांगितले.
-
बेडची संख्या वाढविणे आवश्यक
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता खाटांची उपलब्धता वाढवावी. त्यासाठी पीडीएमसी रूग्णालयासारख्या ठिकाणी आणखी 100 खाटा उपलब्ध होऊ शकतील. याबाबत प्रयत्न करावेत. आवश्यकता वाटल्यास विभागीय क्रीडा संकुलातही चारशे खाटांचे रूग्णालयाबाबत प्रयत्न करता येतील. या सगळ्या बाबी तपासून प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.
-
चढे दर आकारणा-यांवर दंडात्मक कारवाई
आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, तपासणी, उपचारांबाबत दरनिश्चिती करण्यात आली आहे. तथापि, जादा दर आकारल्याच्या व रुग्ण दाखल होताना आगाऊ रक्कम जमा करून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. असे घडता कामा नये. यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी. त्यासाठी वेळोवेळी तपासण्या कराव्यात. गैरप्रकार आढळताच दंडात्मक कारवाई व आवश्यक तिथे परवाना रद्द करण्याची कारवाई करावी. त्याचप्रमाणे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत इतर रूग्णालये सहभागी करण्याबाबतही प्रयत्न व्हावा. रेमडिसिविर इंजेक्शनच्या वापराबाबत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. याबाबत काळा बाजार होऊ नये यासाठी वेळोवेळी तपासण्या कराव्यात. कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी माध्यमांचे सहकार्य खूप आवश्यक आहे. त्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ.शिंगणे म्हणाले की, रेमडिसिविर इंजेक्शनबाबत चढ्या दराने विक्री होत असल्याचे आढळल्यास तत्काळ कारवाई करावी. याबाबत संपूर्ण प्रक्रियेचे संनियंत्रण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काळाबाजार करणा-यांवर कठोर कारवाई केली जाईल. ऑक्सिजनच्या पुरवठा सुरळीत राहील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
कोरोना संकटकाळात आरोग्य व विविध यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत. त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी अमरावती जिल्ह्यात विशेष उपक्रम राबविण्यात आहे. लिक्वीड ऑक्सिजनच्या स्टोरेजसाठी टँक उभारण्यात येत असून, त्याचे काम लवकरच पूर्ण होईल, असेही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले. बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी पत्रकार बांधवांशीही संवाद साधला.
-
सुपर स्पेशालिटी रूग्णालयाची पाहणी
आरोग्यमंत्री श्री. टोपे, पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सुपर स्पेशालिटी रूग्णालय स्थित जिल्हा कोविड रूग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी तेथील डॉक्टर व इतर कर्मचा-यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे मनोबल वाढविले. विभागीय आयुक्त श्री. सिंह, जिल्हाधिकारी श्री. नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम, डॉ. रवीभूषण यांच्यासह विविध डॉक्टर व अधिकारी उपस्थित होते.
कोरोना संकटकाळात रूग्णसेवेची अत्यंत महत्वाची जबाबदारी आपण पार पाडत आहात. कोरोनावर मात करण्यासाठी यापुढेही आपले सहकार्य मोलाचे आहे. यंत्रणेपुढील रिक्त पदांचा प्रश्न व इतर बाबी प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. सध्याची मनुष्यबळाची गरज लक्षात घेता होमिओपॅथी डॉक्टरांच्या नियुक्तीबाबत प्रयत्न होत आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कोरोना संकटकाळात अविरत सेवा बजावल्याबद्दल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेचे डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. रवी भूषण यांच्यासह वैद्यकीय यंत्रणेतील मान्यवरांचा गौरवही यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.