जिल्ह्यातील मत्स्यसंवर्धन क्षेत्राचा पालकमंत्र्यांकडून आढावा
पारंपरिक मत्स्य व्यावसायिकांना प्राधान्य द्यावे - पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. 18 : मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्षे मासेमारी करणा-या मत्स्य व्यावसायिक बांधवांचा या क्षेत्रातील रोजगार कायम राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री एड . यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यातील मत्स्यसंवर्धन क्षेत्राचा आढावा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी राजेंद्र बिसने आदी यावेळी उपस्थित होते.
तलावात पारंपरिक मासेमारी करणा-या काही व्यावसायिकांना परवाने मिळण्याबाबत अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करून उदरनिर्वाह करणा-या समाजाला या क्षेत्रात प्राधान्याने रोजगार मिळवून मिळवून दिला पाहिजे. या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. या गोरगरीब कुटुंबांचे रोजगाराचे साधन त्यामुळे हिरावता कामा नये. त्यामुळे त्यांचा रोजगार कायम राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
मत्स्यसंवर्धन व मत्स्यव्यवसाय विकासाच्या जिल्ह्यातील सर्व शक्यता पडताळून त्यानुरूप योजना- उपक्रमांची अंमलबजावणी केली पाहिजे व अशा योजना- उपक्रमांचा स्थानिक पारंपरिक व्यावसायिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे निर्देश त्यांनी दिले