
अमरावती, दि. ९ : पुनर्वसित गावठाणातील हस्तांतरणास पात्र असलेल्या नागरी सुविधा तात्काळ जिल्हा परिषद किंवा संबंधित ग्रामपंचायतीस हस्तांतरित कराव्या, तसेच अपूर्ण नागरी सुविधा १५ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पुनर्वसन कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. दोन्ही प्रकल्पांच्या अधिका-यांसह विविध अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
श्री. नवाल म्हणाले की, बेंबळा प्रकल्पांतर्गत एकलारा, झिवले, बेलोरा, बेरड, घुईखेड, सावंगा, टिटवा ही सात गावे, तर निम्न वर्धा प्रकल्पांतर्गत वरूड बगाजी, येरली, शिदोडी, तुळजापूर, चिंचपूर, ब-हाणपूर, धारवाडा, दुर्गवाडा, पिंपळखुंटा ही नऊ अशी एकूण सोळा गावे बाधित असून, या गावांतील प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप झाले आहे. या सोळा गावांतील अधिकार अभिलेख सातबारा तयार करण्याचे काम सुरू आहे. पाच गावांचे प्रस्ताव तयार करून उपविभागीय अधिका-यांना पाठविण्यात आले आहेत. सावंगा व टिटवा येथील काम २० सप्टेंबरपर्यंत होईल. उर्वरित गावांची कामे १५ ऑक्टोबरपूर्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, निम्न वर्धा प्रकल्पांतर्गत येरली व चिंचपूर येथील वारंवार लिक होणारी पाईपलाईन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तात्काळ बदलून पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीला हस्तांतरित करावी. शिदोडी गावठाण येथे अंतर्गत नाल्याचे काम करण्यापूर्वी शिदोडी गावाच्या मागील बाजूला असलेल्या नाल्याचे रूंदीकरण करून गाळमुक्त करणे व नंतर विशेष प्रकल्प विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी पाण्याचा उतार पाहून अंतर्गत नाल्याचे अंदाजपत्रक तयार करावे.
बेंबळा प्रकल्पातील पुनर्वसित गावठाणातील हँडपंप दुरूस्तीसाठी आवश्यक निधी प्रकल्पाच्या ठेव निधीतून उपलब्ध करून द्यावा. तसेच उर्वरित ठिकाणी हँडपंपसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.