मराठी

जिल्हाधिका-यांकडून कोविड-19 आजारा विषयक कामकाजाचा आढावा

कोरोना प्रतिबंधासाठी रुग्णालयात सर्व साहित्य-सुविधा सुसज्ज ठेवा -जिल्हाधिकारी शैलेश नवाल

  • मेळघाटसाठी 20 एम्बुलैंस खरेदी करणार

अमरावती, दि. 25: जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या  (Number of corona victims in the district) वाढत असल्याने तपासण्यांची संख्या वाढविणे, संशयित रूग्णांशी संपर्क व उपचार आदी उपाययोजनांना आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाव्दारे गती देण्यात येत आहे. या सर्व उपाययोजनांसह कोरोना विरुध्दची लढाई जिंकण्यासाठी, उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांवर तत्काळ उपचार होण्यासाठी सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांत आवश्यक वैद्यकीय उपकरणे-साहित्यांची व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात आज जिल्हाधिकारी यांनी कोविड-19 आजारासंदर्भात उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा आरोग्य्‍ अधिकारी डॉ. दिलीप रणमले, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतिश हुमने, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वाठोडकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. दिलीप निकोसे, मपनाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ. फिरोझ खान, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. पदमाकर सोमवंशी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अजय साखरे यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बैठकीत प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, सुपरस्पेशालीटी हॉस्पीटल, जिल्हा स्त्री रुग्णालय, पंजाबराव देशमुख मेडीकल महाविद्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय आदी रुग्णालयात कोविड -19 व सारीच्या रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांचा आढावा घेतला.

श्री. नवाल म्हणाले की, शहरात प्रत्येक भागात तपासण्यांत सातत्य ठेवावे. संशयित आढळताच त्याला दाखल करून घेणे, वेळीच उपचार व संपर्कातील इतर व्यक्तींच्या तपासण्या ही कार्यवाही विहित वेळेत होणे आवश्यक आहे. आवश्यक तिथे कंटेनमेंट झोन व इतर कार्यवाही अधिनियम व वेळोवेळी जारी आदेशानुसार काटेकोरपणे करावी. कुठेही हलगर्जीपणा होता कामा नये. शहर व ग्रामीण भागातील हाय रिस्क क्षेत्रात तपासण्यांची संख्या वाढवावी. संशयीत रूग्णांचा शोध घेण्यासाठी पथकांकडून नियमितपणे तपासणी मोहिम राबवावी. ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्यावी.

मेळघाट सारख्या दुर्गम भागासह इतर ठिकाणी रुग्णांच्या उपचारार्थ नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. मेळघाटातील दुर्गम भागात राहणाऱ्या गरोदर महिलांना उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी येण्यासाठी तसेच इतर आजारांच्या रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सुविधा देण्यासाठी 20 एम्बुलैंस खरेदी करण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करुन एम्बुलैंस खरेदी करण्यात याव्यात. त्यासाठी निधीची तरतूद उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी सांगितले.

जिल्ह्यात रुग्णांच्या व संशयीत व्यक्तींच्या सुविधेसाठी विलगीकरण केंद्र स्थापित करण्यात आले आहे. याठिकाणी काही अडचण उद्भल्यास तातडीने त्याचे निराकरण करावे. कोविड रुग्णालयात तसेच विलगीकरण केंद्रात भरती असणाऱ्या व्यक्तीसाठी भोजन, पिण्याचे पाणी, औषधी, ऑक्सिजन यंत्रणा आदी सुसज्ज ठेवावी.
जिल्ह्यात सारी या आजाराचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत असल्याची माहिती चर्चे दरम्यान आरोग्य विभागाने दिली. सारीच्या रुग्णांवर सुध्दा तत्काळ उपचार व्हावेत यासाठी सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपकरणासह सुविधा सुसज्ज ठेवण्यात यावी. काही साहित्यांची कमतरता असल्यास तातडीने खरेदी करुन त्याठिकाणी पुरविण्यात यावे, असे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

यावेळी बैठकीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ मोझरी, समर्पण ट्रस्ट, श्री शिवाजी शिक्षण संस्था, आधार बहुउद्देशिय संस्था, भाग्योदय बहुउद्देशिय संस्था आदी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button