वाढत्या इंधन दरावरून संसदेत पुन्हा गदारोळ
नवी दिल्ली/दि.9 – तमीळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी येथेविधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अधिवेशनात कपात करण्याचा विचार केला जात आहे. मंगळवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींवरून विरोधकांनी संताप व्यक्त केला. दोन्ही सभागृहात महागाईविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
लोकसभेतील विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी करत हौदा गाठला. यानंतर लोकसभा आणि राज्यसभेची कार्यवाही दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करावी लागली. कार्यवाही पुन्हा सुरू झाली, त्यानंतर विरोधकांनी पुन्हा गदारोळ केला. त्यामुळे राज्यसभा दुपारी अडीचपर्यंत तहकूब करण्यात आली. लोकसभेत विरोधकांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबाबत चर्चेची मागणी करत गोंधळ घातला. माजी अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्यात बाजार समिती कायदा आणि किमान हमी भावावरून चांगलीच जुंपली. केंद्र सरकार देशाच्या संघराज्य यंत्रणेत हस्तक्षेप असल्याचा आरोप कौर यांनी केला. सरकारच्या तीनही कृषी कायद्याविरोधात शेतकरी प्रदीर्घ काळ दिल्लीच्या सीमेवर उभा आहे.
लोकसभा तहकूब होण्यापूर्वी काँग्रेसच्या खासदारांनी विचारले, की आम्ही चर्चा करीत असताना प्रक्षेपण बंद का करण्यात आले. त्यावर लोकसभेचेओमप्रकाश बिर्लायांनी लोकसभेतील गदारोळ जनतेला दाखवू शकत नाही, असेउत्तर दिले.