मराठी

सणासुदीच्या काळात महागाईत वाढ

कांदा, बटाटा, टोमॅटोसह भाजीपाल्याचे भाव गगनाला

नवी दिल्ली/दि.३ – एका आठवड्यापूर्वी टोमॅटोला 30 रुपये भाव मिळत होता, आता किलोला 50 रुपये मिळत आहेत. उत्सवाच्या हंगामात भाजीपाल्याचे दर आकाशाला भिडले आहेत. गेल्या एक महिन्यात बटाटा आणि कांद्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. कांद्याच्या किंमती खाली आणण्यासाठी सरकारच्या विविध प्रयत्नांना न जुमानता, देशातील ब-याच राज्यांत बटाटा आणि कांद्याचे दर सतत वाढत आहेत.
अधिकृत आकडेवारीनुसार बंगळूरमध्ये कांद्याचा भाव शंभर रुपये किलो होता. कर्नाटक हे देशातील  कांद्याचे तिसरे सर्वांत मोठे उत्पादक राज्य आहे. राजधानी दिल्लीमध्ये अशीच परिस्थिती आहे. दिल्लीत कांद्याचा भाव 90 ते शंभर रुपये किलो होता. त्याचबरोबर दिल्लीला लागून असलेल्या नोएडा-गाझियाबादमध्ये एनसीआरमधील कांद्याचा भाव ८५ रुपये किलो होता. मुंबईत कांद्याचा भाव ऐंशी ते शंभर रुपये किलो आहे. कोलकातामध्ये कांद्याचे दर ७० रुपये, चेन्नईमध्ये प्रतिकिलो 72 रुपये भाव आहे. पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील उदयपूर आणि रामपूरमध्ये कांद्याला सर्वांत कमी म्हणजे प्रतिकिलो 35 रुपये भाव आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीचा विचार केल्यास गेल्या एका वर्षात घाऊक बाजारात बटाट्यांच्या किंमतीत 108 टक्के वाढ झाली. एका वर्षापूर्वी बटाटे १73९ रुपये प्रतिक्विंटल या भावाने विकला गेला. आता हाच भाव 3,633 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. सध्या दिल्लीत बटाटे 60 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. मुंबईतही हाच दर आहे. त्याचबरोबर कोलकातामध्ये बटाटे 50 ते 65 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहेत. भोपाळमध्ये बटाट्याचा दर प्रतिकिलो 50 ते ५५ रुपये भावाने विकला जात आहे. कांदा, बटाट्याबरोबरच लसून आणि आल्याच्या भावातही वाढ होत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये लसूण 150-160 रुपये आणि आले 90-100 रुपये प्रतिकिलोपर्यंत विकले जात आहे. कांद्याचे भाव आटोक्यात आणण्यासाठी निर्यातबंदी, आयातीला प्रोत्साहन, साठा मर्यादा असे निर्णय घेतले, तर भूतानकडून बटाट्यांची आयात करण्यावर सूट दिली असून त्यासाठी परवान्याची आवश्यकता काढून टाकण्यात आली आहे.
कोटा योजनेत अतिरिक्त 10 लाख टन बटाटे आयात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दर नियंत्रणात आणण्याचा दावा

येत्या काही दिवसांत बटाटा आणि कांद्याचे दर नियंत्रणाखाली येतील. आतापर्यंत नाशिकमध्ये देशभरात कांद्याचा सर्वाधिक पुरवठा होता. आता लवकरच परिस्थिती सामान्य होईल, असा दावा सरकारने केला आहे. गाझीपूर मंडीचे बटाटा-कांदा व्यापारी मनु सिंह म्हणतात, की सणामुळे बटाटा आणि कांद्याची मागणी वाढली आहे. दिवाळीनंतर दर कमी होतील.

Related Articles

Back to top button