मुंबई/दि. ७ – ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा(RHEA CHAKROBORTHY) जामीनअर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. एका महिन्यापासून तुरूंगात असलेल्या रियाचा जामीन खालच्या न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर आज तिला दिलासा मिळाला. रियाची एक लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे.
तुरुंगाबाहेर आल्यानंतर रियाला आपला पासपोर्ट जमा करावा लागेल. ती परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकणार नाही. मुंबईबाहेर जाण्यापूर्वी तपास अधिका-यांना त्यासंदर्भात माहिती द्यावी लागेल. दहा दिवसांत पोलिस ठाण्यात हजेरी लावणे अनिवार्य असेल. यापूर्वी सत्र न्यायालयाने मंगळवारी रियाच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची म्हणजे 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलचा खुलासा झाल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) आठ सप्टेंबर रोजी रिया चक्रवर्तीला अटक केली होती. त्यानंतर तिची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली होती. रियासह सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांनाही मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे; मात्र रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि अब्दुल बासित यांची जामीन याचिका फेटाळण्यात आली आहे.
एनसीबीने(NCB) रिया आणि शोविकच्या जामीनाला विरोध दर्शवला होता. रिया आणि शोविक ड्रग्ज सिंडिकेटचे सक्रिय सदस्य होते आणि हाय प्रोफाइल ड्रग पेडलर्सच्या संपर्कात होते, असे तपास यंत्रणेने न्यायालयाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सोबतच त्यांच्यावर कलम 27 ए लागू करण्यात आला आहे, त्यामुळे त्यांना जामीन मिळू नये. एनसीबीने सांगितले, की रियाने ड्रग्ज खरेदी केल्याची कबुली दिली आहे. तिनेच सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत आणि शोविक यांना ड्रग्ज खरेदी करण्यास सांगितले होते. रिया सुशांतच्या आयुष्यात येण्यापूर्वीच तो ड्रग्ज घ्यायचा, असे रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी न्यायालयात सांगितले होते. सुशांतला अमली पदार्थांचे व्यसन होते. रियासह आणखी दोन अभिनेत्रींनीदेखील याची कबुली दिल्याचे त्यांनी म्हटले. रियाप्रमाणेच श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांनीदेखील सुशांत 2019 पूर्वी ड्रग्ज घेत असल्याचे सांगितले आहे.