मॉस्को दि. ११ – रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनावर विकसित करण्यात आलेल्या लसीला मंजुरी दिली आहे. कुठल्याही सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळवणारी ही जगातील पहिली लस ठरली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीलासुद्धा याच लसीचा डोस देण्यात आला. रशियाच्या ‘गामालिया इन्स्टिट्यूट ऑफ अॅीपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी‘ने ही लस विकसित केली आहे. दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत या लसीच्या मानवी चाचण्या झाल्या आहेत. लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी अंतिम फेजच्या क्लिनिकल चाचण्या सुरू राहणार असल्या तरी सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अमेरिका, चीन, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांच्या आधी रशियाला कोरोना विषाणूवरील लसीची निर्मिती करायची होती. त्यादृष्टीने रशियाकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. सप्टेंबर आणि ऑक्टोबरपासून या लसीची निर्मिती करण्याचा रशियाचा मानस आहे. पुतीन यांच्या अध्यक्षतेखाली लस निर्मितीबद्दल एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत पुतीन म्हणाले होते, की कोरोना व्हायरसवर आपण जी लस बनवू, त्याबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असली पाहिजे तसेच काळजीपूर्वक, संतुलन ठेवून आपल्याला कोरोनावर लसीची निर्मिती करायची आहे.