मराठी

आधी विद्यार्थ्यांची सुरक्षा नंतर परीक्षा !: बाळासाहेब थोरात

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन जेईई-नीट परीक्षा पुढे ढकला.

  • काँग्रेसच्या राज्यव्यापी तसेच ऑनलाईन आंदोलनालाही प्रचंड प्रतिसाद.

मुंबई, दि. २८ ऑगस्ट २०२० देशभरात कोरोनाने थैमान घातले असतानाही मोदी सरकार त्याचा कसलाही विचार न करता जेईई नीट परीक्षा घेण्यावर अडून बसले आहे. या परिक्षेसाठी देशभरातून तब्बल २४ लाख ५० हजार विद्यार्थी बसले आहेत. एवढ्या मोठ्या विद्यार्थांचा जीव धोक्यात घालून परीक्षा कसल्या घेता?विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. त्यामुळे या परीक्षा काही काळासाठी पुढे ढकला,अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

जेईई व नीट परीक्षा ठरवलेल्या तारखेला घेण्यावर केंद्र सरकार ठाम असल्याच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड,आ. झीशान सिद्दिकी, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी, माजी आमदार चरणसिंग सप्रा, यशवंत हाप्पे, राजाराम देशमुख, सुसिबेन शाह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, विद्यार्थी, पालक आणि प्रशासनाचेही केंद्र सरकारने ऐकून घ्यावे. परीक्षा  घेण्यासाठी अधिक सुरक्षित मार्गाचा अवलंब करावा लागेल. एकीकडे कोरोनाचे गंभीर संकट तर दुसरीकडे आसाम, बिहार या राज्यात पुराने थैमान घातले आहे. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रेल्वे व बस सेवाही मोठ्या प्रमाणावर बंदच असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर कसे पोहोचायचे? आणि एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी परिक्षेसाठी एकत्र आल्यास कोरोना संक्रमणाची भीती नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत परीक्षा घेणे कितपत योग्य आहे? केंद्र सरकारने आपली ताठर भूमिका सोडून या लाखो विद्यार्थी, पालकांच्या हिताचा विचार करावा आणि काही काळासाठी परीक्षा पुढे ढकलाव्यात.

केंद्रीय शिक्षण मंत्री पोखरियाल यांनी परीक्षा घेण्यासाठी त्यांच्यावर विद्यार्थी व पालकांचा दबाव असल्याचे केलेले वक्तव्य धादांत खोटे असून परिक्षा कार्ड डाऊनलोड केले म्हणजे विद्यार्थी परीक्षा देण्यास तयार आहेत हा त्यांचा दावा हास्यास्पद आहे. त्यांना परिस्थितीचे गांभिर्य लक्षात आलेले दिसत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेण्यासाठी यंत्रणाही मोठ्या प्रमाणात लागणार आहे. त्यांच्याही आरोग्याचा, सुरक्षेचा विचार करणे गरजेचे आहे, असेही थोरात म्हणाले.

काँग्रेसने आज केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जेईई-नीट परीक्षा पुढे ढकलाव्यात यासाठी #SpeakUpForStudentSafety या हॅशटॅगने चालवलेल्या ऑनलाईन मोहिमेलाही उदंड प्रतिसाद मिळाला.

Related Articles

Back to top button