अमरावती, दि.26 : कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील प्रसिद्ध सालबर्डी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय मध्यप्रदेशातील बैतुलचे जिल्हाधिकारी अमनबीर सिंह यांनी घेतला आहे.
याबाबत अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बैतुल प्रशासनाला पत्र दिले होते. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता हा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड प्रोटोकॉलचे पालन होणे आवश्यक आहे. त्यानुसार बैतुल प्रशासनाकडून सीमेवर बैतुल- परतवाडा रस्त्यावर खोमई बॅरिअर, प्रभातपट्टण- वरूड रस्त्यावर गौनापुर बॅरियर, मुलताई- नागपूर रस्त्यावर खंबारा टोल नाका येथे मेडिकल प्रमाणपत्र व थर्मल स्क्रिनिंग अनिवार्य केल्याचे बैतुल प्रशासनाने कळवले आहे. तेथील धार्मिक कार्यक्रम, भंडारे आदींवरही मर्यादा घालण्यात आली आहे. कोरोना साथ पाहता सध्या तेथील डॉक्टरांनी बैतुलमधून रुग्णवाहिकेद्वारे रुग्ण महाराष्ट्रातील दवाखान्यांत न पाठवता भोपाळ आदी ठिकाणी पाठविण्याचेही निर्देशही बैतुल प्रशासनाने तेथील यंत्रणेला दिले आहेत.