राम मंदिर उभारणीत वाळूचा अडथळा
अयोध्या/दि. १७ – अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पार पडल्यापासून श्रीराम भक्तांच्या मनामनात हे मंदिर वसलेले आहे; मात्र अयोध्येतील भूमीवर मंदिर उभारण्यात अडथळा निर्माण होत आहे. मंदिराचा पाया कसा असावा, यासाठी तयार केलेल्या तज्ज्ञांच्या समितीने विचार करण्यासाठी वेळ वाढवून मागितली आहे. मंदिराच्या कामाबाबत देशातील आठ तज्ज्ञांच्या समितीने मंगळवारीही यावर चर्चा केली. समितीचे अध्यक्ष व्ही.एस. राजू म्हणाले, की लवकर अहवाल सोपवण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. ट्रस्टचे महासचिव चंपत राय बन्सल म्हणाले, की जन्मभूमीखाली असलेल्या वाळू व पाण्यामुळे मंदिर उभारणीत अडथळा येत आहे.
राम मंदिर बांधकामासाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये तज्ज्ञांचा समावेश आहे. आठ जणांच्या या पथकाने श्रीराम मंदिरासाठी १२०० भूमिगत खांबांचे डिझाइन तयार केले आहे. या समितीमध्ये केंद्रीय भवन संशोधन संस्था रुरकी, आयआयटी चेन्नई आणि एनआयटी सुरत येथील तज्ज्ञांचा समावेश आहे. आयआयटी वरंगल मंदिर उभारणीच्या कामासाठी मदत करत आहे. अयोध्येतील संत सांगतात, की नदीकिनारी उभारलेली मंदिरे हजारो वर्षांपासून उभी आहेत. ट्रस्टला या कामात का अडथळा येत आहे, हे समजण्यापलीकडे आहे. आमचा आठ सदस्यांच्या समितीवर पूर्ण विश्वास आहे; मात्र मंदिर उभारणीचे शास्त्र वेगळे आहे. याबाबतचे ज्ञान या समितीकडे नाही.
वास्तूविशारद सुधीर श्रीवास्तव सांगतात, की हजारो मंदिरे अनेक भौगोलिक अडथळे असलेल्या ठिकाणांवर काही वर्षांपासून उभी आहेत. २०१३ च्या प्रलयानंतर केंदारनाथ मंदिर सुरक्षित राहणे हे याचेच एक उदाहरण आहे. केदारनाथ येथील घटना आधुनिक तंत्रज्ञानाला आव्हान देणारी आहे