मराठी

दहा महिन्यांनंतर शाळा सुरू

मुंबई/दि.२७ – सुमारे दहा महिन्यांनंतर मुंबई वगळता संपूर्ण राज्यात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. सकाळपासूनच पुण्यासह राज्यातील अनेक भागात शाळेच्या बाहेर गर्दी दिसून आली. मात्र केवळ मुखपट्टी घातलेल्या विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश दिला जात आहे. अनेक शाळांनी स्वतःहून विद्यार्थ्यांसाठी मुखपट्टीची व्यवस्था केली आहे. शाळांनी शिक्षकांना निगेटिव्ह आरटी-पीसीआर चाचणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, पुढील टप्प्यात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याविषयी सरकार विचार करेल. मुंबई महापालिकेने पुढील सूचना येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्यातील ग्रामीण भागात आजपासून शाळा सुरू झाल्या. शिक्षण मंत्री म्हणाल्या की, पालकांनी आपल्या पाल्यांना मुखपट्टी घालूनच शाळेत पाठवावे. शिक्षण विभागाच्या एका निवेदनानुसार सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी राज्यातील 22 हजार 204 शाळांतील शिक्षण प्रक्रियेत भाग घेण्यास सुरुवात केली आहे. शिक्षण विभागाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, राज्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गात 78.47 लाख विद्यार्थी आहेत. बोर्ड परिक्षांच्या तारखांची घोषणा झाली आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार बारावीच्या बोर्ड परीक्षा 23 एप्रिलपासून तर दहावीच्या बोर्ड परीक्षा 29 एप्रिलपासून सुरू होणार आहेत.

Back to top button