तमीळनाडूत शाळा, महाविद्यालये दहा तारखेपासून सुरू होणार
चेन्नई/दि.१ – तामीळनाडू सरकारने दहा नोव्हेंबरपासून शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, प्राणिसंग्रहालये आणि मनोरंजन पार्क उघडण्यास मान्यता दिली आहे. अति संक्रमित क्षेत्रात मात्र हे सुरू होणार नाही. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार उपनगरीय रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी म्हणाले, की फक्त शाळांमध्ये नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जातील. 50 टक्के क्षमतेसह चित्रपटगृह, मल्टीप्लेक्स, प्राणीसंग्रहालय आणि मनोरंजन पार्क, दहा नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होतील. अति संक्रमित क्षेत्रात मात्र या सुविधा बंदच राहतील. जलतरण तलाव, किनारे आणि पर्यटन स्थळे बंद राहतील. फळ विक्रेते दोन नोव्हेंबरपासून कोयम्बेडू कॉम्प्लेक्समध्ये फळे विकू शकतात. तामीळनाडूमध्ये लग्न समारंभ, अंत्यसंस्कारांना उपस्थित राहणा-यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आता शंभर लोक उपस्थित राहू शकतात. चित्रपटाचे शूटिंग, मालिकांच चित्रीकरण सुरू करता येईल. त्यासाठी संख्येची मार्यादा ठरवून देण्यात आली आहे.