मराठी

महात्मा गांधींच्या विचारांचा गाभा डोळ्यासमोर ठेऊन यापुढे विकास कामे

वृक्ष बचाव समितीच्या सदस्यांकडून जाणून घेतली मते

वर्धा/दि.२०  –  सेवाग्राम हे हेरिटेज ठिकाण आहे.  महात्मा गांधी यांच्या विचारांचा गाभा समोर ठेवूनच यापुढे विकासकामे केली जातील. शाश्वत विकास आणि सुरक्षा या दोन्हीचा समन्वय असलेले विकासाचे मॉडेल सर्वांच्या सहमतीने तयार करण्यात येईल, आणि वर्ध्याचे  विकासाचे मॉडेल यापुढे सर्वांसाठी मार्गदर्शक राहील  असे प्रतिपादन सचिव (रस्ते)उल्हास देबडवार यांनी केले.
दत्तपुर ते वर्धा या 11.5 किलोमीटर  रस्त्याच्या चौपदरीकरामध्ये येणारी झाडे तोडु नयेत यासाठी वर्धा येथील विविध संघटना, संस्था आणि नागरिक मिळून तयार झालेली वृक्ष बचाव समिती सदस्यांची मते जाणून घेण्यासाठी आणि आहे त्या रस्त्याला  पर्याय शोधण्यासाठी आज रस्ते विकास विभागाचे सचीव उल्हास देबडवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम श्रीमती साखरवाडे, कार्यकारी अभियंता गजानन टाके, सुषमा शर्मा, विभा गुप्ता, मुरलीधर बेलखोडे, डॉ आलोक बंग, डॉ विठ्ठल साळवे, श्री म्हस्के,अभय देशपांडे संजय इंगळे तिगावकर, श्रीकांत देशपांडे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी सर्वांची मते ऐकून घेतल्यावर श्री देबडवार म्हणाले, वर्धेमध्ये वृक्ष वाचविण्याबाबत लोक जागरूक आहेत, याचा आनंद आहे. सेवाग्राम हे केवळ वर्धा आणि महाराष्ट्रापुरतं सीमित नाही, तर ज्या व्यक्तीच्या विचार आणि आचारणासमोर सर्व जग नतमस्तक होत त्या महात्मा गांधींच्या वास्तव्याचे हे ठिकाण आहे. त्यामुळे जगासाठी हे अतिशय पवित्र ठिकाण असून, परदेशी पर्यटक गांधी जिथे राहिले तिथे जात आहोत या भावनेतून ते  सेवाग्रामला भेट देतात. त्यामुळे हे जगासाठी हेरिटेज ठिकाण आहे. याचा विकास करताना यापुढे गांधी विचारांचा गाभा त्यात राहील याची पुरेपूर काळजी घेण्यात येईल. वृक्ष बचाव समितीने मांडलेला प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे, आणि तो शासनासमोर ठेवला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीचा अहवाल शासनाला सादर करण्यात येईल, त्यानंतर याबाबत झालेला निर्णय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून  आपल्याला कळविण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी वृक्ष बचाव समितीच्या सदस्यांनी त्यांची मते मांडली. यात प्रामुख्याने या रस्त्यावरील एकही झाड कापू नये. जे झाड कापणार आहे, त्याचे कापण्याचे कारण स्पष्ट केले जावे. पूर्ण झालेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर जी झाडे आहेत त्या प्रत्येक झाडाच्या तीनही बाजूने (रस्त्याची बाजू सोडून)दीड मीटर पर्यंत सिमेंट काँक्रीट फोडून त्यात माती, शेणखत भरून त्याचे पोषण होईल अशी व्यवस्था करावी.  कारण काम करताना अनेकदा त्या झाडाची मुळं  उघडी पडतात. त्यावर 48 तासाच्या आत माती पडली नाही तर ती कमजोर होतात आणि पर्यायाने एक दिवस कोलमडून पडतात.  त्यामुळे यापुढेही रस्त्याचे काम करताना झाडाची मुळं उघडी पडणार नाही याची काळजी घ्यावी. झाडं नालीच्या मध्ये येत असतील तर नाली वळवावी, झाड तोडण्यात येऊ नये. वर्धेच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक बाबींची नोंद घेऊनच पुढील विकास कामे करावीत. स्थानिक नागरिकांची मते त्यात सामावून घेऊन तसे विकासाचे मॉडेल तयार करावे. सेवाग्राम हे जगासाठी शांती आणि अहिंसेचे हेरिटेज आहे. या रस्त्यावरील झाडे महात्मा गांधी सोबतच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी लावली. या भूमीला स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे. पवनार ते सेवाग्राम हा संपूर्ण परिसरच हेरिटेज ठिकाण  म्हणून जतन करताना तेथील सामाजीक, सांस्कृतिक, पर्यावरण, वृक्ष यांचा  विचार करून रस्ते विकसित करावे,  असे मत यावेळी समिती सदस्यांनी व्यक्त केले.

कार्यकारी अभियंता गजानन टाके यांनी रस्त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती देणारे सादरीकरण केले.

Related Articles

Back to top button