अमरावती, दि. ३ : कृषी विद्यापीठांमार्फत नव्याने संशोधित केलेल्या सुधारित व संकरित वाणांच्या प्रसारासाठी कृषी विभागामार्फत रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. ग्रामबीजोत्पादन या योजनेंतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून उत्तम दर्जाचे बियाणे अनुदानावर मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे शेतीतील उत्पादन वाढीस चालना मिळेल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड .यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
शासनाकडून कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसेच बियाणे व लागवड साहित्य उपअभियानाअंतर्गत ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमात रब्बी हंगामासाठी राज्यभरात ३ लाख १४ हजार क्विंटल अनुदानावर वितरीत होणार आहे. त्यासाठी शासनाने ६२.७९ कोटींची तरतूद केली आहे. त्यासोबतच, शाश्वत उत्पन्नवाढीसाठी विविध पीक प्रात्यक्षिकेही राबविण्यात येणार आहेत.
यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामासाठी अत्यंत पोषक असे वातावरण आहे. विविध योजनेंतर्गत गहू, हरभरा, मका, रब्बी ज्वारी, करडई, जवस या पिकांसाठी पीक प्रात्यक्षिके व अनुदानित दराने बियाणे पुरवठा यासाठी बियाण्याचे परिपूर्ण नियोजन आवश्यक आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून क्षेत्र विस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ करण्यासाठी समूह (क्लस्टर) पद्धतीने प्रात्यक्षिकेही घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात सर्वदूर अनुदानावर बियाणे वितरण व प्रात्यक्षिकांचे नियोजन करून या कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.
-
महाबीज व इतर पुरवठादार संस्थांकडून होणार वितरण
रब्बी हंगामामध्ये नवीन विकसित केलेल्या सुधारित-संकरित वाणांचा प्रसार करण्यासाठी अनुदानित दराने शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, कृभको या बियाणे पुरवठादार संस्थांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे वितरित करण्यात येते. १० वर्षाच्या आतील वाणांच्या बियाण्यासाठी गहू २०००रुपये क्विंटल, हरभरा २५०० रुपये क्विंटल, मका (सं) ७५०० रुपये क्विंटल, रब्बी ज्वारी ३००० रुपये क्विंटल यानुसार अनुदान देय आहे, अशी माहिती ‘आत्मा’चे उपसंचालक अनिल खर्चान यांनी दिली.
सुधारित तंत्रज्ञानावर आधारित गहू, हरभरा, मका (संकरित), रब्बी ज्वारी, करडई, जवस आदी पीकांचा नियोजित प्रात्यक्षिकात समावेश आहे. याबाबतचे नियोजन कृषी विभागाकडून होत असल्याचेही त्यांनी सांगितले.