शाहनवाज हुसेन उपमुख्यमंत्री होणार ?
पाटणा/दि.२७ – भाजपने घाईघाईने शाहनवाज हुसेन यांना बिहारमध्ये बोलवून त्यांना विधान परिषदेचे सदस्य केले. त्यांना बिहारचे उपमुख्यमंत्री करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, त्यांना वित्त आणि वाणिज्य कर विभागाची जबाबदारी दिली जाऊ शकते, जी सहसा उपमुख्यमंत्र्यांकडे असते. हुसेन यांना रस्ते आणि आरोग्यासारखे महत्त्वाचे खातेही मिळू शकते. त्यांचे मंत्री होणे जवळपास निश्चित आहे. येत्या काही दिवसांत शाहनवाज यांना बिहारमध्ये उपमुख्यमंत्रीही बनवले जाऊ शकते अशी चर्चा आहे; परंतु इतक्या लवकर हे शक्य नाही, कारण तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी नुकतेच उपमुख्यमंत्री झाले आहेत आणि याक्षणी बदलण्याची कोणतीही परिस्थिती नाही.
शाहनवाज हुसेन यांचे राजकीय जीवन पाहता त्यांनी अगदी लहान वयातच राजकारणात पहिले स्थान मिळवले. 1997 मध्ये एका कार्यक्रमात शहनवाज हुसेन यांचे भाषण ऐकलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणाले की, हा मुलगा फार चांगला बोलतो, संसदेत पाठविला गेला तर तो वडीलधार्यांना मागे टाकेल. त्यांना 1998 मध्ये किशनगंजमधून उमेदवारी दिली; परंतु ते पराभूत झाले; मात्र त्याच्या पुढच्याच वर्षी पुन्हा एकदा निवडणुका झाल्या तेव्हा शाहनवाज खासदार झाले आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री झाले. त्यांना अन्न प्रक्रिया उद्योग, युवा कार्य व क्रीडा मंत्रालयात राज्यमंत्री करण्यात आले. 2001 मध्ये त्यांना कोळसा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला. नागरी विमानचालन पोर्टफोलिओसह सप्टेंबर 2001 मध्ये कॅबिनेट मंत्री झाले. शाहनवाज हे भारताचे सर्वांत तरुण केंद्रीय मंत्री झाले. त्यांनी वस्त्रोद्योग मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मात्र ते पराभूत झाले; परंतु 2006 च्या पोटनिवडणुकीत भागलपूर मतदारसंघातून विजयी झाले. 2009 मध्ये शाहनवाज भागलपूर मतदारसंघातून पुन्हा जिंकले; परंतु 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत देशभरात मोदी लाट आली, तेव्हा शाहनवाज यांना पराभवाला सामोरे जावे लागले. शाहनवाज यांनी अभियांत्रिकीपर्यंत शिक्षण घेतले आहे. 5-5 मंत्रालये सांभाळण्याचा त्यांचा अनुभवही आहे. अशा परिस्थितीत नंतर शाहनवाज हुसेन यांना योग्य उपमुख्यमंत्री केले गेले तर नवल नाही. भाजप त्यांना उपमुख्यमंत्री बनवून ’मुस्लिम’ चेहरा म्हणून पाठवू शकते.