मराठी

शिपिंग इंडियाचे ६३ टक्के भाग विकणार

मुंबई दि २२ – शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील ६३.७५ टक्के भाग भांडवल  केंद्र सरकार विकणार आहे.  आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या निर्गुंतवणुकीच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी, केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.
केंद्र सरकारला निर्गंतुवणुकीतू दोन लाख दहा हजार कोटी रुपयांचे भांडवल उभे करायचे होते. कोरोनामुळे निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेची गती कमी झाली. आता अर्थव्यवस्था सावरत असताना सरकारने  शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या खासगीकरणांतर्गत 63. 75 टक्के भागभांडवल विक्री करण्यासाठी खासगी कंपन्या आणि गुंतवणूकदारांकडून निविदा मागविल्या आहेत. एससीआयमधील शासनाचा बहुतांश हिस्सा खरेदी करण्यासाठी कंपन्या व्याजपत्र (एक्सप्रेसन्स ऑफ इंटरेस्ट (ईओआय)) सादर करू शकतात. या वर्षाच्या सुरुवातीला सरकारला आपला भाग विकण्याची इच्छा होती; परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे त्याला उशीर झाला आहे.
केंद्र सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी निर्गुंतवणुकीद्वारे दोन लाख दहा हजार कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे; परंतु आतापर्यंत छोट्या कंपन्यांमधील निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून सरकार केवळ 11 हजार सहा कोटी रुपये जमा करू शकली आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारने प्रथम बीपीसीएल आणि एअर इंडियामधील आपला हिस्सा विकण्यासाठी निविदा मागविल्या आणि आता एससीआयमधील आपला हिस्सा विकण्यास खासगी कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत. एससीआयमध्ये २9.69 कोटी इक्विटी शेअर्सची विक्री करण्याची सरकारची योजना आहे, जे कंपनीच्या 63.75 टक्के समभागांच्या समतुल्य आहे. यासाठी गुंतवणूकदार स्वतंत्रपणे किंवा कन्सोर्टियमद्वारे बोली लावू शकतात. सध्याच्या शेअर किंमतीनुसार एससीआयचे बाजारमूल्य सुमारे चार हजार कोटी रुपये आहे. या बातमीनंतर आज शेअर बाजारामध्ये कंपनीच्या समभागात 3.81 टक्क्यांनी वाढ झाली आणि त्याची किंमत 85.80 रुपयांवर गेली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आर्थिक बाबींच्या मंत्रिमंडळाच्या समितीने एससीआयमधील बहुमताचा भाग विक्री करण्याच्या योजनेस मान्यता दिली होती; परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे त्याची खासगीकरण प्रक्रिया लांबणीवर पडली होती.

Related Articles

Back to top button