मराठी

कंगनाला शिवसेना देणार आणखी एक झटका

मुंबई/दि. १३ – वादग्रस्त वक्तव्य करत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(UDDHAV THACKREY) यांच्या महाविकासआघाडी सरकारला आव्हान देणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतला लवकरच एक नवा झटका बसण्याची शक्यता आहे  मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या पाली हिल कार्यालयातील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केल्यानंतर आता तिच्या खारमधील घरालाही बेकायदेशी बांधकामाप्रकरणी नोटीस दिली. त्यामुळे कंगनाच्या कार्यालयानंतर आता घरावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेने म्हटले आहे, की कंगनाच्या घरात बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे कंगनाच्या कार्यालयापेक्षाही तिच्या घरात महापालिकेच्या नियमांचे अधिक उल्लंघन झाले आहे. दरम्यान, कंगनाच्या घरातील अवैध बांधकामाचा खटला सध्या सुरू आहे. त्याची पुढील सुनावणी 25 सप्टेंबरला होणार आहे. कंगना मुंबईतील खार (पश्चिम) येथे राहते. ऑरकिड ब्रिजच्या 16 क्रमांच्या एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर तिचे तीन फ्लॅट आहेत. एक फ्लॅट 797 चौरस मीटर, दुसरा फ्लॅट 711 चौरस मीटर आणि तिसरा फ्लॅट 459 चौरस मीटरचा आहे. 8 मार्च 2013 रोजी या तिन्ही फ्लॅटची नोंद कंगनाच्या नावावर झाली आहे.
कंगनाने हे फ्लॅट घेतल्यानंतर पाच वर्षांनी 13 मार्च 2018 रोजी मुंबई महापालिकेला या फ्लॅट्समध्ये बेकायदेशीर बांधकाम केलेले आढळले. याबाबतच्या तक्रारीनंतर 26 मार्च 2018 मध्ये महापालिकेकडून कंगनाच्या फ्लॅट्सची पाहणी करण्यात आली. त्याच दिवशी कंगनाला महापालिकेने बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी नोटीस दिली. महापालिकेने कंगनाला पाठवलेल्या नोटिशीत फ्लॅटमध्ये 8 प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम केल्याचे म्हटले आहे. महापालिकेने या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कंगनाला उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली. तसेच समाधानकारक उत्तर न मिळाल्यास ते बांधकाम हटवण्याचा इशारा देण्यात आला. 22 मे 2018 रोजी या प्रकरणी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. आता महापालिकेने न्यायालयाकडे तात्काळ कारवाई करण्याची परवानगी मागितली आहे. याचीच सुनावणी 25 सप्टेंबर रोजी होणार आहे.

नोटिशीतील आक्षेप

1. इलेक्ट्रिक फिटिंगचे संक सिमेंटने भरण्यात आले आणि त्याचा उपयोग कार्पेट एरिया म्हणून करण्यात आला.
2. झाडे लावण्यासाठी असलेल्या जागेवर पायऱ्या करण्यात आल्या.
3. खिडकीवर लावण्यात आलेल्या छताच्या भिंती काढून त्याचा उपयोग बाल्कनी म्हणून करण्यात केला जात आहे.
4. सर्विस स्लॅब संक सिमेंटने भरला आहे आणि त्याच्या शेजारची भिंत तोडून त्याचे रुपांतर बाल्कनी आणि रुममध्ये करण्यात आले.
5. उत्तर-पश्चिम दिशेने पायऱ्या आणि स्वयंपाकघर यामध्ये सामाईक रस्ता आणि स्वयंपाक घराजवळ दरवाजा बनवण्यात आला.
6. तीन फ्लॅट्समध्ये असलेल्या सामाईक जागेवर लिफ्टच्या समोरच बेकायदेशीर दरवाजे तयार करण्यात आले.
7. तिन्ही फ्लॅट्सला जोडण्यासाठी विनापरवानगी सामाईक भिंत तोडण्यात आली.
8. शौचालय आणि बाथरुमजवळील पाईपचा आकार बदलण्यात आला आहे किंवा झाकून टाकण्यात आले आहेत.

Related Articles

Back to top button