शिवाजीराव निलंगेकर यांचे निधन
पुणेः- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय ९१) यांचे आज पहाटे निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती बरी झाल्याने नुकतेच त्यांना घरी पाठवण्यात आले होते; मात्र मूत्रqपड निकामी झाल्याने बुधवारी पहाटे दोन वाजून ३० मिनिटांनी त्यांनी पुण्यातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. श्रीरामपूर येथील विजय बनकर आणि श्रीगोंद्याचे राजेंद्र नागवडे यांच्यांशी त्यांचा नातेसंबंध होता.
शिवाजीराव निलंगा विधानसभा मतदारसंघाचे सर्वाधिक काळ आमदार होते. निलंगा तालुक्यात शैक्षणिक गंगा आणून ग्रामीण भागातील विद्याथ्र्याची गैरसोय होणार नाही, यासाठी सतत प्रयत्न करणारे, तळागाळातील जनतेचे कैवारी, अशी त्यांची ओळख होती. शिवाजीरावांचा ९ फेब्रुवारी १९३१ रोजी निलंगा येथे जन्म झाला. ते हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक होते. एम.ए., एल.एल.बीपर्यंत त्याचे शिक्षण झाले होते. दादासाहेब या नावाने ते सर्वांना परिचित होते. राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याची मंत्रिपदे त्यांनी लीलया सांभाळली. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर राज्याचे दहावे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी टाकली. तीन जून १९८५ ते सहा मार्च १९८६ असे नऊ महिन्यासाठी ते राज्याचे मुख्यमंत्री होते. अतिशय शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे ते होते. अतिशय परिपक्व उत्तरे ते नेहमीच मुलाखतीत, पत्रकार परिषदेत देत असत.
कोरोनासारख्या महाभयंकर आजारावर त्यांनी वयाच्या नव्वदीतही मोठ्या जिद्दीने मात केली होती; मात्र दुर्देवाने त्यांचे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. राज्याच्या राजकारणातील पितामह असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला. गांधी घराण्याशी त्यांची जवळीकता होती. एमडी परीक्षेत आपल्या मुलीच्या गुणांमध्ये बदल केल्याचे समजल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता, त्यांचा कार्यकाळ सर्वांत अल्प मानला जातो.
शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भाजपचे माजी मंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू आहेत. एकमेकांच्या विरोधात त्यांनी विधानसभा निवडणुकाही लढवल्या आहेत. राजकारणातले कट्टर विरोधक असलेले आजोबा-नातू यावर्षीच शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला एकत्र आले होते. .