मुंबई/सुरत दि. ६ – संकटाच्या काळातही ज्वेलरची मागणी वाढत आहे. निर्यातीचे आदेश वाढत आहेत. तथापि, मनुष्यबळ कमी असल्याने आम्ही मागणी पूर्ण करता येत नाही. दागिन्यांची प्रचंड मागणी असूनही उत्पादक मागणी पूर्ण करू शकत नाहीत. २५ टक्केही उत्पादन होत नाही. सुमारे चार महिन्यांपूर्वी कोरोनामुळे स्थलांतरित मजूर गावी गेल्याने या उद्योगाला मजुरांची टंचाई जाणवत आहे. आभूषण उद्योग आता या कामगारांना परत आणण्यासाठी विमाने तिकीट, अधिक पगार द्यायला तयार असूनही कामगार परत यायला तयार नाहीत. स्थलांतरित मजूर परत येत असले, तरी अजूनही मोठ्या प्रमाणात मजूर गावाकडे आहेत. दागिन्यांची, आभूषणांची मागणी वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी कामगारांची गरज आहे. रत्न व ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने म्हटले आहे, की कुशल कामगारामुळे जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाला आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
जीजेईपीसीचे अध्यक्ष कॉलिन शहा म्हणाले, की संकटाच्या काळातही मागणी वाढली आहे. निर्यातीचे आदेश वाढत आहेत. असे असूनही आम्ही मनुष्यबळ कमी असल्यामुळे मागणीची पूर्तता करू शकत नाही. टाळेबंदीदरम्यान इतर क्षेत्रांप्रमाणेच, दागिने उद्योगातून मोठ्या संख्येने कामगार स्थलांतरित झाले. याचा परिणाम आता उद्योगाला जाणवतो आहे. शासनाच्या आदेशानुसार केवळ २५ टक्के कर्मचा-यांना एकाच वेळी काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. शहा म्हणाले, की ज्वेलरी उद्योगातील बहुतेक कुशल कारागीर पश्चिम बंगाल, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील आहेत. साथीच्या काळात ते सर्व मुंबईहून आपल्या घरी गेले. बहुतेक कारखाने त्यांच्या एकूण क्षमतेच्या २५ टक्के कामगारांवर कार्यरत आहेत. यामुळे मागणी आणि उत्पादनात मोठी तफावत निर्माण झाली आहे.
‘रामकृष्ण एक्सपोर्ट‘चे व्यवस्थापकीय संचालक राहुल ढोलकिया म्हणाले, की कंपनी केवळ एका पाळीत काम करत आहे. त्यांच्या उत्पादनांना मुख्यत: अमेरिका आणि चीनसह इतर देशांकडून चांगली मागणी आहे. प्राधान्य ज्वेलर्सचे संस्थापक शैल्स सांगानी म्हणाले, की भारतीय ज्वेलरी निर्यात क्षेत्र मनुष्यबळाच्या कमतरतेशी झगडत आहे. अधिक पैसे आणि हवाई तिकिटे देण्यास तयार आहोत; परंतु ते इतके दिवस घरी राहिल्यानंतर कामगार आता परतायला तयार नाहीत. मुंबईत सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे ते परत यायला तयार नाहीत.
बाजारपेठ गमवण्याची भीती
निर्यात ऑर्डर पूर्ण करण्यास असमर्थ असले, तर थायलंड, व्हिएतनाम आणि चीनसारख्या देशांच्या तुलनेत भारताचा ज्वेलरी व्यवसाय इतर देशांकडे जाऊ शकतो. भारतीय ज्वेलरी उद्योगाची त्याला तयारी नाही. अमेरिकेतून ज्वेलरीची कामे मोठ्या संख्येने येत आहेत. विशिष्ट श्रेणींमध्ये पॉलिश केलेल्या वस्तूंचे ऑर्डर मिळाल्या आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला कोणत्याही कींमतीत व्यवसाय गमवायचा नाही.