कोरोनाग्रस्तांकडून योग्य भाडेच आकारावे
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; रुग्णवाहिका उपलब्धतेचे निर्देश
नवी दिल्ली/दि. ११ – कोरोना(COVID-19) या महासाथीच्या काळात कोविड रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज होणाऱ्या रुग्णवाहिकांकडून जादा भाडे वसूल करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने(SUPREME COURT) चिंता व्यक्त केली आहे. देशातील सर्व राज्यांमधील रुग्णवाहिकांनी रुग्णांकडून योग्य ते भाडे आकारावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. देशातील सर्व राज्ये व केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांशी बांधील असून कोरोना रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णवाहिका कशा उपलब्ध होतील, याची काळजी राज्य सरकारांनी घ्यावयाची आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची बाजू मांडली. या संबंधात केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केले असून एक स्टँडर्ड ऑफ प्रोसिजर जारी केले आहे, अशी माहिती मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने एक आपत्कालीन प्रतिक्रिया योजना तयार केली असून स्टॅडंर्ड आॅफ प्रोसिजरदेखील जारी केली आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या प्रवासासाठी स्टॅडंर्ड आॅफ प्रोसिजरदेखील निश्चित केले असून यात सर्व राज्यांना सविस्तरपणे निर्देश देण्यात आले आहेत.
२९ मार्च, २०२० या दिवशी जारी करण्यात आलेल्या स्टॅडंर्ड आॅफ प्रोसिजरचे राज्यांनी पालन करणे आवश्यक असून रुग्णवाहिका उपलब्ध केली गेली पाहिजे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच ज्यांना रुग्णालयात जाणे आवश्यक आहे, अशा गरजू लोकांना मदतीसाठी प्राधान्य दिले गेले पाहिजे, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे; मात्र या निर्देशांमध्ये रुग्णवाहिकांनी किती मूल्य आकारावे याबाबत सांगण्यात आलेले नाही, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
राज्य सरकारांनी रुग्णवाहिकांचे उचित मूल्य ठरवावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. कोरोनाबाबत रुग्णवाहिकांबरोबरच इतरही आवश्यक उपाययोजना करण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेचा देखील या सुनावणीदरम्यानसर्वोच्च न्यायालयाने निपटारा केला.