मथुरा/ दि. १२ – उत्तर प्रदेशातील मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमीचे प्रकरण परत एकदा न्यायालयात पोहचले आहे. सोमवारी श्रीकृष्ण विराजमानकडून जिल्हा न्यायालयात केस दाखल करण्यात आली आहे, यात १३.३७ एकर जमिनीवर दावा करत मालकी हक्काची मागणी केली आहे. यासोबतच शाही ईदगाह मशिदीला हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायालयात वकील हरिशंकर जैन आणि विष्णू जैन यांनी दोन तास युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी १६ ऑक्टोबरची तारीख दिली आहे. हरिशंकर जैन यांनी सांगितले, की न्यायालयाने प्रकरणाची संपूर्ण प्रकारे शहानिशा केली आहे. १६ ऑक्टोबरला प्रकरणाची पुढील सुनावणी होईल. १९६८ मध्ये झालेला करार एक फ्रॉड होता. श्रीकृष्ण जन्मभूमीचा एक मोठा भाग मशिदीला दिला होता. यापूर्वी २५ सप्टेंबरला वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर ३० सप्टेंबरला झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती. श्रीकृष्ण विराजमानकडून अॅड. रंजना अग्निहोत्री यांनी, ज्या ठिकाणी शाही ईदगाह मशीद आहे, त्या ठिकाणी कारागृह होते, ज्यात भगवान कृष्णाचा जन्म झाला, असा दावा केला.