‘थर्टी फर्स्ट’ला शहरात अनुचित प्रकार रोखण्यासाठी विशेष मोहिम
अमरावती, दि. 22 : नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली नशेत बेदरकारपणे गाड्या चालवणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. ‘थर्टी फर्स्ट’ला शहरात अनुचित प्रकार रोखण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिले आहेत.
तळीरामांवर होणार कारवाई
‘थर्टी फर्स्ट’चा उत्सव साजरा करताना बेधुंद वर्तणूक, नशेत बेदरकारपणे गाड्या चालविण्याचे प्रकार घडत असतात. अनेक नागरिक विशेषत: तरूण वर्ग मद्यप्राशन करून वाहनासह रस्त्यावर येतात. अनेकजण अतिउत्साहात स्टंट रायडिंग करतात. अशावेळी अपघात घडून जिवितहानी व मालमत्तेचे नुकसान झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ प्रतिबंधासाठी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
प्रमुख चौकात नाकाबंदी करा
शहराच्या प्रमुख चौकात, तसेच पोलीस ठाणे हद्दीतील आवश्यक ठिकाणी बॅरिकेटस् लावून नाकाबंदी मोहिम राबवावी. स्टंट रायडिंग, भरधाव वेगाने गाडी चालवणा-यांवर कारवाई करावी. अतिवेगाने वाहन चालविणा-यांव कारवाई करताना इंटरसेप्टर वाहनाचा उपयोग करावा. आकस्मिक वाहन तपासणी मोहिम राबवून विनाक्रमांक, फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
आतषबाजीची वेळ निश्चित
ऑनलाईन ई-कॉमर्स फटाक्यांवर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. नाताळ अर्थात 25 डिसेंबरला व नववर्ष उत्सव अर्थात 31 डिसेंबरला फटाके फोडण्याची वेळ रात्री 11.55 ते रात्री 12.30 पर्यंत अशी निश्चित करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी या वेळेचे व नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. सिंह यांनी केले आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरंट शासनाकडून वेळेवर प्राप्त आदेशानुसार निर्धारित वेळेत सुरू राहतील. ते या वेळेनंतर सुरू राहिल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.