मराठी

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिक्षक मतदारांना विशेष नैमेत्तिक रजा

निवडणूक निर्णय अधिकारी पीयुष सिंह

अमरावती, दि. 29 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी (एक डिसेंबर) शिक्षकांना विशेष नैमेत्तिक रजा मंजूर करण्यात यावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील यंत्रणांना दिले आहेत.

त्यानुसार शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिका-यांना जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ही रजा कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल, अशी तरतूद करण्यात आली आहे.

  • मतमोजणी कक्षाच्या 100 मीटर परिसराच्या आत प्रवेशास प्रतिबंध

मतमोजणी कक्ष व सुरक्षा कक्षाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मतमोजणी अधिकारी, कर्मचारी व निवडणूक आयोगाचे विहित नमुन्यातील ओळखपत्र असणा-या व्यक्तींव्यतिरिक्त दि. 2 डिसेंबर रोजी सायंकाळी आठपासून ते दि. 3 डिसेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विलासनगर येथील शासकीय धान्य गोदाम येथील मतमोजणी स्थळाच्या 100 मीटर परिसराच्या आत प्रवेशास प्रतिबंध  करण्यात आला आहे. उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना अधिकृत पासआधारे प्रवेश मिळेल.

  • मतमोजणीच्या ठिकाणी संपर्क साधनांवर प्रतिबंध

मतमोजणीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे झेरॉक्स, फॅक्स मशिन, ई- मेल किंवा इतर संपर्क साधनांच्या गैरवापरावर प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, मतमोजणी ठिकाणाच्या 100 मीटर परिसरात मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, कॅल्क्युलेटर आदी साधनांच्या वापरावर प्रतिबंध करण्यात आला आहे. तथापि, वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार बांधवांना मतमोजणी स्थळाच्या परिसरात असलेल्या मीडिया कक्षातच मोबाईल वापरण्याची मुभा असेल.

Related Articles

Back to top button