अमरावती, दि.१० : खासगी रूग्णालयांकडून कोरोना प्रतिबंधक उपचारांसाठी औषधे, ऑक्सिजन व सेवेचे दर शासनाने यापूर्वीच निश्चित केले आहेत. रुग्णालयांकडून त्याचे पालन काटेकोरपणे होण्यासाठी स्वतंत्र तपासणी पथक गठित करण्यात आले असून, त्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज निर्गमित केला.
खासगी रुग्णालयांत रेमडीसिविर इंजेक्शन, औषधे, ऑक्सिजन यांचे आकारण्यात येणार दर, रुग्णांची बिल तपासणी आदी बाबींची हे पथक वेळोवेळी तपासणी करेल, तसेच रुग्णांच्या तक्रारींचे निराकरण करेल. पथकातील सदस्यांचे मोबाईल क्रमांकही प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत. पथकात उपजिल्हाधिकारी राम लंके (मो. क्र.8888352800), तहसीलदार संतोष काकडे (मो. क्र. 9527271200), महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सचिन सानप (मो. क्र. 9967470776), औषधी निरीक्षक मनीष गोतमारे (मो. क्र. 9552574495), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर (मो. क्र. 9545463450) यांचा समावेश आहे.
शासनाच्या निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने रुग्णांकडून आकारणी होते किंवा कसे, याची नियमित तपासणी हे पथक करणार आहे. कोरोना निदानासाठी आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले असून अँटीजेन टेस्ट 150 रुपये करण्यात आले आहेत. आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमूने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जावून नमूने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी 250, 300 आणि 400 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी 350, 450, 550 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 150, 200 आणि 300 असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.
रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी रुटीन वॉर्ड व आयसोलेशनसाठी अधिकतम दर चार हजार, अतिदक्षता वॉर्डात व्हेंटिलेटर नसेल तर साडेसात हजार रूपये व व्हेंटिलेटर असेल तर 9 हजार रुपये निश्चित केलेले आहेत. त्यात सीबीसी, युरिन रुटीन, एक्स रे, ईसीजी, बेड चार्जेस, ऑक्सिजन चार्जेस आदी विविध सेवांचा समावेश आहे.
कोरोनाबाधित रूग्णाला विविध प्रकारच्या तपासण्याव्यतिरिक्त सी. टी. स्कॅनसारख्या तपासण्यांची आवश्यकता भासत असल्याने कोविड व नॉनकोविड रूग्णांसाठी एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मशिनच्या क्षमता वैशिष्ट्यानुसार ही दर आकारणी निश्चित करण्यात आली आहे. एचआरसीटी-चेस्ट तपासणीसाठी 16 स्लाईसच्या मशिनसाठी दोन हजार रूपये, मल्टि डिटेक्टर सीटी (एम डी सीटी) 16 ते 64 स्लाईसच्या मशिनसाठी अडीच हजार रूपये, 64 स्लाईसहून अधिकच्या मशिनसाठी तीन हजार रूपये दर निश्चित केले आहेत. या रकमेत सीटी स्कॅन तपासणी, तपासणी अहवाल सिटी फिल्म, पीपीई कीट, डिसइन्फेक्टेड, सॅनिटायझेशन चार्जेस व जीएसटी यांचा समावेश आहे. एचआरसीटी चेस्ट नियमित व तातडीच्या तपासणीसाठी हे समान दर लागू राहतील.