ग्रामीण भागात उभारणार स्टार्टअप्स पार्क
जिल्ह्यात स्टार्टअप्सला प्रोत्साहन द्यावे -पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. 10 : राज्यातील ग्रामीण भागात आयटीआयच्या माध्यमातून स्टार्टअप पार्कची स्थापना करण्याचे शासनाचे नियोजन असून, जिल्ह्यातही स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम राबवावेत, असे निर्देश राज्याचे महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज दिले.
तरुणांच्या नवकल्पनांना चालना देण्याबरोबरच स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून शासनात नाविन्यता आणणे या हेतूने कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचा नुकताच घेण्यात आला. त्यात सहभागी स्टार्टअप्सपैकी उत्कृष्ट स्टार्टअप्सना नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा ही संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी प्रत्येकी पंधरा लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामाचे कार्यादेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातूनही स्टार्टअप्सना चालना मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, ग्रामीण भागात आयटीआयच्या माध्यमातून स्टार्टअप पार्कची स्थापना करण्याचे शासनाचे नियोजन आहे. तरुणांच्या नवकल्पनांना चालना देण्याबरोबरच स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून शासनात नाविन्यता आणणे हे उद्दिष्ट आहे. तरूणांकडील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर त्याद्वारे होणार आहे. वैशिष्ट्यपूर्ण कल्पकतेतून कृषी, शिक्षण, कौशल्य विकास, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, प्रशासन आदी विविध क्षेत्रात अभिनव बदल घडवू शकणारे स्टार्टअप जिल्ह्यातूनही पुढे येण्याची गरज आहे.
त्यासाठी शहरांबरोबर ग्रामीण भागातही स्टार्टअप्स विकसित व्हावीत यासाठी स्थानिक पातळीवरूनही प्रयत्न व्हावेत. ग्रामीण भागातील तरुणांच्याही विविध कल्पनांना व्यासपीठ मिळवून देणे गरजेचे आहे, यासाठी प्रोत्साहनपर उपक्रम राबवावेत. अशा उपक्रमातून उत्तमोत्तम संकल्पना पुढे येऊन प्रशासकीय सुधारणांसाठीही त्याचा उपयोग होऊ शकेल. जिल्ह्यात विविध स्टार्टअपना चालना मिळणे आवश्यक आहे. तरूणाईला विधायक उपक्रमांकडे वळविण्यासाठी त्यांच्या अभिनव संकल्पनांना प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात स्टार्टअप्सना चालना मिळण्यास वाव आहे. त्यामुळे तरूणांतील नाविन्यपूर्ण संकल्पनांना व्यासपीठ मिळाल्यास त्याचा प्रशासकीय सुधारणांनाही उपयोग होईल व विकासालाही गती मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत पशु आरोग्य व्यवस्थापन यंत्रणा, रोबोटद्वारे जलप्रदूषणावर नियंत्रण, इलेक्ट्रिक स्कूटर शेअरिंग, सेन्सर आधारित सिंचन व्यवस्थापन, हृदयविकार समस्येवर उपाययोजना करणे, दिव्यांगांना (अंध) सक्षम करणे, कुशल कामगारांद्वारे निर्मित वस्तुंच्या विक्रीसाठी व्यासपीठ देणे, आरोग्य क्षेत्रातील रोजगार निर्मितीचा नवीन मार्ग, माहितीचे प्रभावी विश्लेषण करणे, प्रशासकीय प्रक्रियेकरीता ब्लॉक चेनचा वापर, शेतकऱ्यांसाठी गोदाम आणि इतर सुविधांचे व्यवस्थापन. बोअरवेलमधील पाण्याचे शुद्धीकरणासाठी यंत्रणा, वीज वापराच्या नियंत्रणासाठी यंत्रणा, शहरी भागातील हवेच्या प्रदुषण नियंत्रणासंदर्भातील यंत्रणा अशा नावीन्यपूर्ण स्टार्टअप्सची निवड करण्यात आली आहे.