मुंबई/दि.२० – काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो वेळीच हाणून पाडण्यात आला, असा गोप्यस्फोट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर आता भाजपामधून त्यांना लक्ष्य केले जात आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका करताना, राज्याचे गृहमंत्री वाचाळवीर आहेत. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
भातखळकर म्हणाले, वाचाळवीर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नवीनच शोध लावला आहे, की राज्यातील काही आयपीएस अधिकारी ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे, सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर सरकारने काय कारवाई केली? याची माहिती त्यांनी एवढे दिवस जनतेपासून का लपवून ठेवली? तसेच सुशांत आणि दिशा सालीयन प्रकरणात दोन महिने ज्यांना इंचभरही पुढे सरकता आले नाही, ते पोलीस अचानक ठाकरे सरकार पाडण्या इतके सक्षम कसे झाले? त्यांनी असे कोणते च्यवनप्राश खाल्ले? असे सवालही भातखळकर यांनी सरकारला केले आहेत.
गृहमंत्र्यांनी पवारांकडून धडे घ्यावेत
यापूर्वी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही देशमुखांना टोला लगावला. गृहमंत्र्यांच्या बुद्धीची किव येते, गृहमंत्र्यांनी अशी वक्तव्य करताना 100 वेळा विचार करावा, ज्या अधिकाऱ्यांबद्दल ते बोलत आहेत त्या महिला आहेत. कोणत्याही महिला अधिकाऱ्याचा अपमान करणे योग्य नाही, शरद पवारांकडून गृहमंत्र्यांनी क्लासेस घ्यावेत. संजय राऊतांनीच घरचा आहेर दिला ते बरे झाले असे त्यांनी म्हटले आहे. तसेच प्रवीण दरेकर यांनी देशमुखांच्या विधानावर प्रतिक्रिया देत, राज्याच्या गृहमंत्र्यांनी असे बोलणे अपेक्षित नाही. राज्यात अशी कृत्ये करण्याची अधिकाऱ्यांची हिंमत नाही. पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या मर्यादा माहिती आहेत. गृहमंत्री, राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी, अशी विधाने करत आहेत, असे म्हटले आहे.
पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही. मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. त्यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, असे सांगणे, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने करणे, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वत: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि माझ्यात चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आले.
मग नेत्यांचा काय उपयोग? – खा. संजय राऊत
गृहमंत्री देशमुख यांच्या विधानाविषयी खा. संजय राऊत म्हणाले की, अधिकारी जर सरकार पाडायचे काम करू लागले तर निवडून आलेल्या नेत्यांचा काय उपयोग? महाराष्ट्रातले सरकार एवढे लेचेपेचे नाही. काही अधिकाऱ्यांविषयी पहिल्याच दिवशी शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत मते सांगितली होती. काहींना ताबडतोब बदलले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यातील किती बदल झाले, हे गृहमंत्रीच सांगू शकतील असं ते म्हणाले.