मुंबई/दि.१२– राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत राज्यातील जवळपास नऊ मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे तीन, काँग्रेसचे तीन, शिवसेनेचे दोन आणि एका अपक्ष मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या अनिल परब यांना उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, काल राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागप्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत अनिल परब सुद्धा उपस्थित होते.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, या सर्वांनी कोरोनावर मात केली असून सध्या ते मंत्रिमंडळात काम करीत आहेत.