मराठी

डॉक्टरांविरोधातील वक्तव्य राऊतांना भोवणार

मार्ड‘ने राऊत यांच्याविरोधात तक्रार केली

मुंबई/दि. १८ – खासदार संजय राऊत यांना डॉक्टरांविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. ‘मार्ड‘ने राऊत यांच्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केलेली असतानाच ‘इंडियन मेडिकल असोसिएशन‘ने (इमा) राऊतांविरोधात थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे तक्रार केली आहे. राऊतांना डॉक्टरांचा अवमान करणारी विधाने करण्यापासून रोखा, अशी विनंती ‘इमा‘ने नायडू यांना केली आहे. ‘इमा‘ने थेट नायडू यांना पत्र लिहून संजय राऊत यांची तक्रार केली आहे. राऊत हे महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्य आहे. त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना डॉक्टरांचा अवमान करणारे विधान केले. डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला अधिक कळते. मी नेहमीच कंपाऊंडरकडून औषधे घेतो, डॉक्टरांकडून नाही, असे ते या मुलाखतीत म्हणाले होते. तसेच जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ही निरुपयोगी संस्था आहे. डब्ल्यूएचओच्या निष्काळजीपणामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे, असेही राऊत यांनी म्हटल्याचे ‘इमा‘ ने तक्रारीत म्हटले आहे.

१६ ऑगस्ट रोजी आमच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात राऊत यांच्या वक्यव्याच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच राऊत यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत आणि डॉक्टरांची माफी मागावी, असा ठरावही करण्यात आला. राऊत यांचे हे विधान डॉक्टरांचा अवमान करणारे तर आहेच; पण डॉक्टरांचा अनादर करणारेही आहे. त्यामुळे राज्यातील डॉक्टरांच्या भावना दुखावल्या आहेत. गेल्या साडेचार महिन्यांपासून कोरोनाच्या संकटातही धैर्याने काम करणारया डॉक्टरांचे मनोबल खच्चीकरण करणारे राऊत यांचे वक्तव्य आहे. त्यामुळे राऊत यांना अशा प्रकारची विधाने न करण्याची समज द्यावी, अशी मागणीही ‘इमा‘ने नायडू यांच्याकडे केली आहे. ठाणे शाखेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राऊत यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.

डॉक्टरांबाबत चुकीचे विधान नाही

दरम्यान, डॉक्टरांवर जेव्हा जेव्हा संकट आले, तेव्हा शिवसेनाच धावून आली. मी स्वत: अनेक प्रकरणात डॉक्टरांची बाजू घेऊन त्यांच्या मागण्या मार्गी लावल्या आहेत. डॉक्टरांना मारहाण झाली तव्हा तोडफोड करणारयाना आम्हीच समजावून समेट घडवून आणला आहे; मात्र सध्या विशिष्ट विचारसरणीचे लोक माझ्या विरोधात मोहीम चालवत आहेत, असा आरोप करताना राऊत यांनी डॉक्टरांबाबत मी कोणतंही चुकीचे विधान केलेले नाही, असे स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button