मराठी

प्रवाशांना एसटीची दिवाळी भेट

हंगामी भाडेवाढ न करण्याचा निर्णय

मुंबई/दि.२९ – दिवाळीच्या सुटीत एसटीने प्रवास करणा-या प्रवाशांना एसटीने भेट दिली आहे. दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एसटीकडून केली जाणारी हंगामी दरवाढ या वेळी रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या काळात एसटीकडून दरवाढ केली जाते; मात्र या वर्षी ही दरवाढ रद्द केल्यामुळे दिवाळीच्या सुट्टीला गावाकडे जाणा-याना मोठा दिलासा मिळणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाने अशा बिकट परिस्थितीत अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द केली आहे. या माध्यमातून एसटीने ‘प्रवाशी देवो भव:’ या भूमिकेला साजेसा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे परब यांनी सांगितले.
राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्त्रोत म्हणून एसटीकडून दरवाढ केली जाते. ही दरवाढ 30 टक्क्यांपर्यंत करण्याचा अधिकार एसटी महामंडळाला आहे. या अधिकारानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या काळात सर्व प्रकारच्या बससेवेसाठी 10 ते 15 टक्क्यांपर्यंत दरवाढ करून अतिरिक्त महसूल मिळवण्याचा एसटीचा प्रयत्न असतो.

Related Articles

Back to top button