पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही
मदद व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट
मुंबई/दि.१ – पूर्व विदर्भातील पूरग्रस्त भागात जेईई-नीटची(JEE-NEET) परीक्षा पुढे ढकलता येणार नाही, असा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, कुठल्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ देणार नाही, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.
पूर्व विदर्भातल्या ज्याठिकाणी परीक्षा केंद्र आहेत त्याठिकाणी पूर नाही. एखादा विद्यार्थी पोहचू शकला नाही तर त्याने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रिप्रेझेंटशन करावे, एनटीए त्यावर निर्णय घेईल. कुठल्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही पण परीक्षा पुढे ढकलणार नाही असं नागपूर खंडपीठाने म्हटले. दरम्यान कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नसल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही – उदय सामंत
आजपासून ते 6 सप्टेंबर 2020 या कालावधीमध्ये जेईई मुख्य आणि 13 सप्टेंबर 2020 रोजी नीट परीक्षा होणार आहे. विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे या भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी संवाद साधला. सामंत यांनी विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये,अशी विनंती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांना केली आहे. ही विनंती त्यांनी तात्काळ मान्य करीत या भागातील एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले.