मुंबई : विकास निधी वाटपात दुजाभाव (Disadvantages in the allocation of development funds) होत असल्याचा आरोप करत आपल्याच सरकारविरोधात उपोषणाचा इशारा देणाऱ्या काँग्रेसच्या ११ आमदारांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांना फोन करून समजूत काढल्यावर उपोषण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडीतील आमदारांच्या मतदारसंघात निधी वाटप करताना दुजाभाव केला जात असल्याच आरोप गोरंट्याल यांनी केला होता. मतदारसंघात सर्वांनाच काम करायचे आहे. त्यामुळं निधीचे वाटपही समान झाले पाहिजे; मात्र तसे होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना झुकते माप दिले जाते, अशी नाराजी गोरंट्याल यांनी व्यक्त केली होती. राज्यातील काँग्रेस नेतृत्वाला याची कल्पना दिल्यानंतरही न्याय न मिळाल्याने गोरंट्याल यांच्यासह ११ आमदारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यांचा रोख थेट पवार यांच्यावर होता. शिवसेनेनेही या मुद्द्यावरून हात झटकले होते. काँग्रेसचे आमदार नाराज असतील तर तो काँग्रेसचा प्रश्न आहे. निधी वाटपाविषयी त्यांचे काही आक्षेप, आरोप असतील तर पवार त्यावर उत्तर देतील, असे शिवसेनेने म्हटले आहे. पवारांनी आज गोरंट्याल यांना फोन केला व त्यांच्याशी चर्चा केली. ‘दुजाभाव करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. यापुढे निधीवाटप करताना तुमचा प्राधान्याने विचार केला जाईल. जालना जिल्ह्यातील विकास कामांसाठीही भरीव निधी दिला जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. त्यावर समाधानी असल्याचे सांगत गोरंट्याल यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.