मुंबई/दि. २१ – कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वीजमीटरचा निर्माण झालेला तुटवडा दूर करण्यासाठी महावितरणने निविदाअंतर्गत पुरवठादारांना १८ लाख सिंगलफेज तर १ लाख ७० हजार थ्रीफेज नवीन वीजमीटर पुरवठ्याच्या दिलेल्या कार्यादेशान्वये १ लाख ४४ हजार ९०४ वीजमीटर महावितरणकडे उपलब्ध झाले असून मार्च अखेरपर्यंत ३ लाख ८० हजार वीजमीटरचा पुरवठा होणार आहे.
महावितरणकडून दरवर्षी सुमारे ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. मार्च २०२० नंतर कोरोना प्रादुर्भाव व ‘लॉकडाऊन’मुळे नवीन वीजमीटरची उपलब्धता काही प्रमाणात कमी झाली होती.तरीही जून २०२० नंतर महावितरणतर्फे ६ लाख ५० हजार ५२३ सिंगलफेज तर ६२ हजार ५५ थ्रीफेज ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत. मीटरअभावी ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध झालेले वीजमीटर तातडीने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश मुख्य कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेले आहेत.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मुबलक वीजमीटरच्या उपलब्धतेसाठी एका वर्षापेक्षा अधिक कालावधीचे नियोजन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत वीजमीटरची कमतरता जाणवणार नाही, यासाठी महावितरणतर्फे उपाययोजना करण्यात आलेली आहे. त्यानुसार निविदा प्रक्रियेद्वारे सिंगल फेजचे १८ लाख आणि थ्री फेजचे १ लाख ७० हजार असे एकूण १९ लाख ७० हजार नवीन वीजमीटरचा दि. १० फेब्रुवारी २०२१ रोजी दिलेल्या पुरवठा आदेशाचा महावितरणमार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे. वीजमीटरच्या तुटवड्याअभावी वीजग्राहकांची गैरसोय होणार नाही, यासाठी निश्चित केलेल्या कालावधीनुसार वीजमीटरचा क्षेत्रीय कार्यालयांना नियमित पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. सिंघल यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत वरिष्ठ अधिकारी व पुरवठादारांना दिले आहेत.
सद्यस्थितीत महावितरणच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाकडे ३८ हजार ७०४, कोकण प्रादेशिक कार्यालयांकडे ६९ हजार ७००, नागपूर प्रादेशिक कार्यालयाकडे २० हजार तर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाकडे १६ हजार ५०० या प्रमाणात वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
सद्यस्थितीत महावितरणला दररोज सुमारे ८ ते १० हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा सुरु झाला असून मार्चअखेर सिंगल फेजचे ३ लाख २० हजार आणि थ्रीफेजचे ६० हजार नवीन मीटर उपलब्ध होणार आहेत. तसेच एप्रिल ते ऑगस्ट-२०२१ पर्यंत सिंगल व थ्री फेजचे तब्बल १४ लाख ६० हजार नवीन वीजमीटर उपलब्ध होणार आहेत. महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सध्या सिंगल फेजचे २ लाख ४१ हजार ८८२ तर थ्रीफेजचे २८ हजार ३८६ नवीन वीजमीटर उपलब्ध असून वीजमीटरचा कोणताही तुटवडा भासणार नाही. सध्या महावितरणतर्फे पर्याप्त मीटर उपलब्ध करून देण्यात आले असून ग्राहकांनी खुल्या बाजारातून वीजमीटर खरेदी करण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.